अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक संघर्ष आणि सामाजिक मर्यादांना छेद देत रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील सपना वाघमारे हिने यशाचा नवा इतिहास रचला आहे. रोहा तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातून शिक्षणाची वाट चालू करणारी ही जिद्दी तरुणी आता एलएलएमच्या उच्च शिक्षणासाठी थेट लंडनला झेपावणार आहे. इंग्लंडमधील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स तसेच क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे तिची निवड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दहावीपर्यंत शिक्षण आश्रमशाळेत घेतलेल्या सपनाने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यात उच्च शिक्षण घेतले. अथक परिश्रम, जिद्द आणि शिक्षणावरील निष्ठेच्या जोरावर तिने रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान पटकावला. आता तिची लंडनकडे झालेली झेप कातकरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर नातेवाईकांनी कठीण काळात दिलेली साथ आणि शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच हा खडतर शैक्षणिक प्रवास शक्य झाल्याची भावना सपनाने व्यक्त केली.
