केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

उष्णतेने कहर केला असताना, पावसाचे लवकर आगमन होण्याची आनंदवार्ता हवामान विभागाने शुक्रवारी दिली. सरासरी तारखेपेक्षा पाच दिवस आधीच म्हणजे २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. येत्या २४ तासांमध्ये नैर्ऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला, अंदमानच्या समुद्रात, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचू शकतात.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरण

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एक जून मानली जाते. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीमुळे मान्सूनला चालना मिळाली असून अंदमान-निकोबार बेटांवरही मान्सून सहा दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अंदाजे तारीख २६ मे असून यामध्ये अधिक-उणे चार दिवसांचा फरक पडू शकतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर समुद्रावरून या वाऱ्यांना होणाऱ्या आर्द्रतेच्या पुरवठ्यावर मान्सूनचा पुढील प्रवास अवलंबून असतो. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राबद्दलचा अंदाज वर्तवण्यात येईल. मात्र केरळमध्ये मान्सून दाखल होताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व वातावरणनिर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती ‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. एल निनोचा परिणाम यंदा जुलैपासून दिसण्याची सुरुवात आहे. त्यामुळे पर्जन्य जलसंचयन महत्त्वाचे आहे, याकडे हवामान अभ्यासक लक्ष वेधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *