पुण्याहून नाशिकला लग्नाला, आईचं दूध प्यायल्यानंतर चिमुकलीची हालचाल थांबली; चार महिन्याच्या लेकीच्या मृत्यूचं खरं कारण समोर

पुणे जिल्ह्यातून नाशिकला एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळानं भीषण घाला घातला आहे. अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा दूध पिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे एकलहरा गेट परिसर आणि नातेवाईकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथील रहिवासी शुभम काटेकर हे आपल्या कुटुंबासह नाशिकरोड येथील एकलहरा गेट परिसरात एका नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. 14 मे गुरुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 4 वाजेच्या सुमारास चिमुकलीची कोणतीही हालचाल होत नसल्याचं वडिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी चिमुरडीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार ‘अस्पिरेशन निमोनिया’या आजाराने त्यांच्या लेकीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7:10 वाजता डॉ. पाटील यांनी तपासून तिला मृत घोषित केलं. आनंदाच्या वातावरणात आलेल्या या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचं पथक रुग्णालयात दाखल झालं. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार समोर आलेल्या माहितीनुसार आईचं दूध पिल्यानंतर हे दूध किंवा लाळ ही उलट्या श्वासाद्वारे फुफ्फुसात ओढल्या गेल्यामुळे फुफ्फुसांत याचा संसर्ग झाला. हे पदार्थ श्वसन मार्गात अडकले, त्यामुळे फुफ्फुसात गंभीर जंतूंचा संसर्ग झाला आणि फुफ्फुसांना सूज आल्यानं मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपासी अंमलदार पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हणजे काय?

‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हणजे अन्न, पाणी किंवा लाळ हे उलट्या श्वासावाटे फुफ्फुसात ओढल्या गेल्यामुळे होणारा फुफुसांचा संसर्ग. जेव्हा हे पदार्थ श्वसन मार्गात अडकतात तेव्हा त्यामुळे फुफुसांमध्ये गंभीर जंतूंचा संसर्ग होतो आणि तिथे सूज येते. यालाच मराठीमध्ये ‘शोषणी फुफ्फुस शोध’ किंवा ‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हटलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *