बायकोसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांचा जीव घेतला, लेकीच्या लग्नाचा आनंद विरला

मुलीच्या लग्नाचा सोहळा आनंदात पार पाडून घरी परतलेल्या दाम्पत्याच्या डोक्यात त्यांच्या पोटच्या मुलानेच मुसळ घालून त्यांची निर्घृण हत्या केली. पत्नीसमोर आई वडिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला वेळीच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.

घरगुती कारणातून मुलासोबत वादावादी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीतील इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजुदेवी महतो हे आपल्या मुलीचे लग्न आटोपून आनंदाने घरी परतले होते. घरात लग्नाची लगबग आणि उत्साह कायम होता. मात्र, घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत काही कारणाने वाद झाला.

आई-वडिलांनी बायकोसमोर अपमान केल्याचा राग

वादादरम्यान आई-वडिलांनी चंदन याला त्याच्या पत्नीसमोर अपमानास्पद शब्द वापरले. पत्नीसमोर आई-वडिलांनी आपला अपमान केला, ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा राग अनावर झाला. त्याने घरातील मुसळ उचलून थेट जन्मदात्या आई आणि वडिलांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रांजुदेवी महतो आणि इंदाराम महतो या दोघांचाही जागीच रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत्यू झाला.

पळून जाण्याच्या तयारीत, शेजाऱ्यांनी पकडलं

स्वत:च्याच आई-वडिलांचा जीव घेतल्यानंतर संशयित चंदन पळून जाण्याच्या तयारीत होता. घरातून घाईघाईने बाहेर पडणाऱ्या चंदनला पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून त्याला जागीच पकडून ठेवले आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी चंदन याला ताब्यात घेतले.

दुसरीकडे, मालेगाव शहरालगतच्या कोकणदरा शिवारात शेख जिया शेख हारुण (वय २३) या तरुणाचा अज्ञात संशयितांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आली. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी हा खुनाचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. कोकणदरा शिवारात दगडाने ठेचून जिया शेख या तरुणाचा अज्ञात संशयितांनी निर्घृणपणे खून केला. या घटनेची माहिती अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना मिळताच त्यांनी पवारवाडी पोलिस ठाणे व फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जिया शेखचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *