तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव, पण महिनाभराने गूढ उकललं; सख्ख्या भावानेच संपवलं, कारणही उघड

तालुक्यातील मंगरूळ येथे काही दिवसांपूर्वी एका ३० वर्षीय युवकाचा दुचाकीवरून घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या अत्यंत चाणाक्ष आणि तांत्रिक तपासामुळे या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. हा अपघात नसून दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडण केल्याच्या रागातून सख्ख्या भावानेच भावाचा डोकं जमिनीवर आपटून खून केल्याचे उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत शुभम हा सिल्लोड येथील एका खाजगी बँकेत नोकरीला होता आणि तो अविवाहित होता. तर आरोपी अतुल हा विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत. १० मे रोजी मंगरूळच्या शेतशिवारातील रस्त्यावर शुभम बालाजी खेळवणे हा दुचाकीवरून घसरून गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, घटनास्थळ आणि वाहनाची पाहणी करताना पोलिसांना दुचाकीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. तसेच शुभमच्या शरीरावर अपघातासारख्या जखमा नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या पथकाचा संशय बळावला.

मकं काय घडलं होतं त्या दिवशी?

पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांची कसून चौकशी सुरू केली असता खरा प्रकार समोर आला. घटनेच्या दिवशी मृत शुभमने दारूच्या नशेत गावातील एका व्यक्तीशी वाद घालून शिवीगाळ केली होती. ही बाब त्याचा मोठा भाऊ अतुल बालाजी खेळवणे याला समजली. संतप्त झालेल्या अतुलने शुभमला घरी बोलावून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्याचे डोकं जोरात जमिनीवर आदळले.

आरोपी भावाला ३ दिवसांची पोलीस कोठडी

तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपी अतुलचा बनाव टिकला नाही आणि अखेर पोलिसांनी गुरुवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपी अतुल खेळवणे याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *