भारतामध्ये मागील काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली असतानाच पालघर तालुक्यात चांदी वाहून नेणाऱ्या एका व्हॅनचा विचित्र अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या या व्हॅनचा अपघात झाल्याने या व्हॅनमधील 600 किलो चांदीच्या विटा रस्त्यावर पडल्या होत्या. गाडीमध्ये चांदीच्या विटा असल्याने अपघाताची माहिती कळताच या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलीस हजर झाले. अपघाताच्या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करेपर्यंत पोलिसांनी या ठिकाणी खडा पहारा दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्हॅनचा कंटेनरसारखा भाग तुटून पडल्याने व्हॅनमध्ये ठेवलेल्या चांदीच्या विटा अघाताच्या ठिकाणी तुटलेल्या व्हॅनच्या सांगड्यावरच होत्या. या 600 किलो चांदीची किंमत 17 कोटी 66 लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या कंपनीच्या मालकीची ही चांदी?
मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी नेली जात होती. चांदीची वाहतूक करणाऱ्या या व्हॅनचा पालघर तालुक्यात अपघात झाला. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.
चांदी महागली, आयात शुल्क वाढलं
परदेशी चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनं खऱेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर सरकारने आयात शुल्क वाढवलं आहे. मोदींनी 10 आणि 11 मे रोजी केलेल्या या आवाहनानंतर 12 मे रोजी केंद्र सरकारने चांदी आणि सोन्यावरील आयात कर 6% वरून 15% केला. यामध्ये 10% बेसिक कस्टम ड्यूटी + 5% AIDC चा समावेश आहे. हा निर्णय 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाला. विदेशी मुद्रा साठा वाचवण्याबरोबरच अतिरिक्त आयात शुल्क आकारुन रुपयाला आधार देणे आणि अनावश्यक आयात रोखण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचं सांगितलं जात आहे.
एकदा दिवसात 16 हजारांची वाढ अन् पडझड
नवे दर लागू झाल्याने 13 मे रोजी एका दिवसात चांदी ₹16675 ने वाढून ₹2,95,805 प्रति किलोवर पोहोचले आहेत. प्रॉफिट बुकिंगच्या उद्देशाने 14 मे रोजी चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने दरांमध्ये अल्पशी घसरण झाली. साधारणपणे 2 ते 3 हजार रुपये प्रति किलोने दर कमी झालेत.
