विद्याविहार स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेने सलग तीन रात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. आज, शुक्रवार मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू होईल.
कुर्ला ते भांडुपदरम्यान १५ ते १८ मे या कालावधीत अप-डाउन धीम्या जलद मार्गांसह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रात्री उशिरा धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसवर ब्लॉकचा परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जत येथे जाणाऱ्या डाउन धीम्या लोकल रात्री ११.३० ते १२.१२ वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरून धावणार आहेत. कसारा, बदलापूर, कर्जत आणि अंबरनाथ येथून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
ब्लॉकवेळेत दोन्ही दिशेने लोकल नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. ठाणे-कुर्ला, ठाणे-सीएसएमटी धावणाऱ्या काही सामान्य आणि एसी लोकल रद्द राहणार आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतरच्या ब्लॉकमध्ये मेल, एक्स्प्रेस आणि लोकलवर परिणाम होणार नाही. रविवार मध्यरात्रीनंतरच्या ब्लॉकमध्ये लोकलवर परिणाम होणार नाही.
ब्लॉक कधी ?
१५/१६ मे (शुक्रवारी मध्यरात्रीनंतर) -मध्यरात्रीनंतर ०१.१५ ते पहाटे ०४.१५
१६/१७ मे (शनिवारी मध्यरात्रीनंतर) -मध्यरात्रीनंतर ००.१० ते पहाटे ०४.४०
१७/१८ मे (रविवारी मध्यरात्रीनंतर) -मध्यरात्रीनंतर ०१.१५ ते मध्यरात्रीनंतर ०३.०५
दादरमध्ये पाच तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात अप आणि डाउन धीम्या मार्गिकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी आज, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर धावणार आहेत. फलाट उपलब्ध नसल्याने महालक्ष्मी, लोअर परळ, माटुंगा रोड, प्रभादेवी, माहीम स्थानकात लोकल थांबणार नाहीत. प्रवासी सुविधेसाठी चर्चगेटवरून शुक्रवारी रात्री ११.३१ ला सुटणारी वांद्रे लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. ही लोकल विरारपर्यंत चालवण्यात येईल. बोरिवलीहून चर्चगेटला येणारी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता रवाना होईल.
