अखेर मनोमीलन! सत्तासंघर्षानंतर अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर

अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तेसाठी गेले पाच महिने शिवसेना, भाजपमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर मावळला आहे. शिवसेनेकडून भाजपला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर, बुधवारी दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आणि राज्य पातळीच्या नेत्यांमध्ये झालेल्या सकारात्मक वाटाघाटीच्या चर्चेनंतर शिवसेना-भाजप युतीला मुहूर्त मिळाला. त्यानुसार गुरुवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जुने मतभेद विसरून शहर विकासाला प्राधान्य देत युतीच्या माध्यमातून शहर विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले.

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फोडाफोडीच्या राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे वाद न्यायालयात गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीचा गट नुकताच वैध ठरवला. त्यामुळे २७ नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजप अल्पमतात तर, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवेसना ३२ नगरसेवकांसह बहुमतात आली. त्यामुळे न्यायालयीन सत्ता संघर्ष संपल्यानंतर शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका घेत आणि शहर विकासाचे ध्येय समोर ठेवत भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला भाजपनेही शहर विकासाला प्राधान्य देत सकारात्मक प्रतिसाद दिला.  बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थानिक शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या सत्ता संघर्षात नगरपालिकेतील तीन सर्वसाधारण सभा तसेच प्रशासकीय कारभारावर मोठा परिणाम झाला होता. तसेच, पालिकेतील मुख्याधिकारी आणि विभागप्रमुखांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मर्जी सांभाळतांना तारेवरची करसत करावी लागत होती. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांनीही या युतीनंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *