प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव आणि धमक्या दिल्याच्या रागातून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर मधील काळेपडळ परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली असून, अटकेत असलेला प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गणेश संजू बिरादार (वय 25, रा. ससाणेनगर, हडपसर) असे मृताचे नाव आहे. दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (वय 21, रा. शुक्रवार पेठ), पारस किशोर गायकवाड (वय 21, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित ऊर्फ अभि संजय इंगळे (वय 22), सोमनाथ रमेश दोरकर (वय 21), साहिल सागर शेलार (वय 24, सर्व रा. हडपसर) आणि चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय 20, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे.
रात्रीच्यावेळी निर्घृणपणे संपवलं
तीन मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ससाणेनगर परिसरातील एका इमारतीजवळ गणेश थांबला असताना आरोपी तेथे पोहोचले. त्यांनी गणेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून घटनास्थळावरून पळ काढला. गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार केली होती. सापळा रचून आरोपींना वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
