भाभा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान 27 वर्षीय महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांकडून डॉक्टरांना मारहाण

मुंबई महापालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयामध्ये प्रसूतीदरम्यान एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या नातेवाईकांनी ड्युटीवर असलेल्या निवासी डॉक्टरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सोनी यादव या गर्भवतीला बुधवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. गर्भावस्थेचे ३८ आठवडे पूर्ण झाले होते. नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यानंतरही, प्रसूती होऊ शकली नाही. त्यामुळे रात्री सिझेरिअन करून मुलाचा जन्म झाला. त्यानंतर त्या महिलेची प्रकृती अधिक खालावू लागली. पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास, पोटाचा घेर वाढणे आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून आली. तिला अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘सीपीआर’सह सर्व प्रयत्न केले. मात्र तिला वाचवता आले नाही.

त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली, तसेच रुग्णालयामध्येही तोडफोड केली. एका निवासी डॉक्टरांचे डोके भिंतीवर आपटले, तर दुसऱ्या निवासी डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अजून एका डॉक्टरांना ट्रॉलीसह ढकलले.

‘मार्ड’कडून निषेध
आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रचंड तणावाखाली काम करणाऱ्या डॉक्टरांविरोधातील अशा प्रकारच्या हिंसेचा ‘ मार्ड ‘ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘ मार्ड ‘ डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. रुग्णालयाची सुरक्षा अधिक सक्षम करावी, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये कठोर सुरक्षा नियमावलीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *