मुंबई- मांडवा जलवाहतूक बंद; अलिबाग सहलीचे बेत बोंबलले! काय आहेत प्रवासाचे पर्यायी मार्ग?

मुंबई शहरापासून साधारण जलवाहतुकीच्या मार्गानं तास- दीड तासाचा प्रवास करून अलिबाग, मांडवा, रेवदंडा अशी ठिकाणं अगदी सहज गाठता येतात. मात्र, आता येत्या काळात अलिबागला जायचे बेत असतील तर, आधी मनस्तापाचाच सामना तुम्हाला करावा लागणार आहे. कारण, आहे ते म्हणदे गेटवे-मांडवा जलवाहतूक बंद होणं.

पावसाच्या दिवसांमध्ये येणारी वादळं, वाऱ्याचा वाढणारा वेग आणि खवळणारा समुद्र यामुळं सागरी वाहतुकीला निर्माण होणारा धोका पाहता मान्सूनचा अधिकृतपणे सुरुवात होण्यापूर्वीच गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळ, मांडवा विभागाच्या बंदर निरीक्षकांनी त्याबाबतचे अधिकृत निर्देश जारी केले. (PNP) पीएनपी, मालदार (Maldar), अजंठा (Ajantha) या कंपनीच्या बोटी (Gateway to Mandwa) गेटवे ते मांडवा या जलवाहतूक मार्गावर प्रवासी जलवाहतूक करतात. मात्र वरील निर्देशांनंतर ही वाहतूक निर्धारित कालावधीत बंद असेल. रस्ते मार्गानं अलिबागपर्यंतचा प्रवास करण्याच्या तुलनेत अनेकांचं प्राधान्य जलवाहतुकीला असतं. अनेकांसाठी हा प्रवास किफायतशीरसुद्धा ठरतो. शिवाय प्रवासासाठी कमी वेळ लागत असल्यामुळं क्षणात मुंबईच्या धकाधकीपासून दूर पोहोचता येतं. तेसुद्धा सागरी मार्गानं.

मात्र, मे – ते ऑगस्टदरम्यान ही सेवा बंद राहणार असल्यानं प्रवाशांना रस्ते मार्गाचाच पर्याय अवलंबावा लागणार आहे. गेटवे ते मांडवाशिवाय भाऊचा धक्का ते रेवसपर्यंतची दुचाकी अन् प्रवाशांना नेणारी जलवाहतूकसुद्धा बंद असेल. मात्र, याच मार्गावर  रो -रो  सेवा यादरम्यानसुद्धा उपलब्ध असेल ज्यामुळं वेळेची बचत हा एकमेव हेतू असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असेल.मात्र रो रो जलवाहतुकीसाठीच्या खर्चातही नवे दर लागू करण्यात आल्यानं हा प्रवास आता आणखी महागला आहे. ज्यामुळं अनेकांनाच दोन दिवसांच्या सहलीसाठी किंवा अलिबागच्या दिशेनं जाण्यासाठी हा पर्याय खर्चिक भासतो. सरतेशेवटी रस्ते मार्गाचाच पर्याय प्रवासाठी उरतो. जिथं अटल सेतूची उपलब्धता असली तरीही खारपाडा, चिरनेर, वडखळ इथं होणारी वाहतूक कोंडी मात्र कोणाला चुकत नाही. पोयनाड, कार्लेखिंडदरम्यानसुद्धा अनेकदा वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात डोकं वर काढत असल्यामुळं अलिबागचा प्रवास काहीसा त्रासदायक ठरेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *