1 लाख लाडक्या बहिणी अपात्र, पात्र महिलांच्या खात्यात मार्चचे पैसे खटाखट जमा; एप्रिल महिन्याचं काय?

राज्यभर गाजलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे 12 लाख महिलांना लाभ मिळत होता. मात्र, अलीकडे राबविण्यात आलेल्या eKYC पडताळणी व दुरुस्ती प्रक्रियेनंतर सुमारे एक लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. पडताळणीदरम्यान कागदपत्रांतील त्रुटी, आवश्यक माहितीचा अभाव तसेच शासनाने निश्चित केलेल्या निकषांमध्ये न बसणारे अर्ज आढळल्याने लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक लाख महिला अपात्र

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. लाभार्थींची अचूकता तपासण्यासाठी eKYC प्रक्रिया राबविण्यात आली. या पडताळणीनंतर सुमारे एक लाख महिला अपात्र ठरल्या असून, केवळ निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पुढील लाभ देण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांसाठी मार्च महिन्याचा हप्ता गुरुवार (दि. 14) पासून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.

एप्रिलचा हफ्ता अजूनही नाही

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मे महिन्याचा मध्य उलटून गेला असूनही पुढील हप्त्याबाबत स्पष्टता नसल्याने महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे. पात्र महिलांना लाभ नियमितपणे मिळावा यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर आता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 40 लाखांच्या दरम्यान होती. मात्र, लाखो महिलांनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा मिळतात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *