दू अशोक खरात याच्याशी संबंध नाही म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर तीन दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रेडिसनमध्ये एकत्र होत्या, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरही होती का? असा सवालही अंधारे यांनी विचारला आहे. मीडिया रिपोर्टच्या आधारे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे यांचे आरोप
महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय अशोक खरात प्रकरणात खोलात गेला आहे. आर्थिक अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रुपाली चाकणकर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. अशातच “गुवाहाटीला हॉटेल ब्लू रॅडिसन येथे खरात आणि चाकणकर भगिनी अशा तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला.” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
अशोक खरातच्या कुकर्मांचा पाढा
दरम्यान, दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्र-तंत्राच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोक खरात याच्याविरोधात दाखल अत्याचाराच्या आठ गुन्ह्यांपैकी पहिल्या दोन गुन्ह्यांत विशेष तपास पथकाने न्यायालयात सविस्तर पुरावे सादर केले आहेत. दोन्ही गुन्ह्यांत दोन हजारांपेक्षा जास्त पानांचे ‘चार्जशीट’ सादर झाले असून, तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यामुळे खरातच्या कुकर्मांच्या पेटाऱ्यातील प्रत्येक गोष्ट आता न्यायालयासमोर स्पष्ट होणार आहे.
