पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या डेपोमध्ये बस फेरी पूर्ण करून आल्यानंतर त्या बंद न करता सुरूच ठेवण्याचे प्रकार वाढल्याने इंधनाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे समोर आले आहे. अनेक डेपोमध्ये चालक बस सुरू अवस्थेतच सोडून चहा-पाणी किंवा इतर कारणांसाठी दूर जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत असून, त्यामुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विनाव्यवस्था उभ्या असलेल्या या बस कोणीही घेऊन जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
‘पीएमपी प्रशासनाने चालकांना बस सुरू ठेवून खाली उतरू नये,’ अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक चालक या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. बस बंद केल्यानंतर ती पुन्हा सुरू होईल की नाही, याबाबत खात्री नसल्याने काही चालक इंजिन सुरूच ठेवतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, एका फेरीनंतर पुढील फेरी सुरू होण्यास साधारण दहा मिनिटांचा अवधी लागतो. या दरम्यान, इंधन वाया जात असल्याचे सांगितले जात आहे.
पीएमपीच्या दररोज सुमारे १८०० बस रस्त्यावर धावत असून, जवळपास दहा लाख प्रवासी या सेवेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत बस सुरू ठेवून निष्काळजीपणे सोडण्याच्या प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. ‘तांत्रिक तपासणी, कडक नियंत्रण आणि संबंधितांवर जबाबदारी निश्चित करूनच या प्रकारांना आळा बसू शकतो,’ असे परिवहन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
बसच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह
बस बंद केल्यावर पुन्हा सुरू होणार नाही, अशी भीती चालकांना वाटत असेल; तर बसची देखभाल योग्य पद्धतीने होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पीएमपी प्रशासनाने बसची संपूर्ण तपासणी आणि दुरुस्ती झाल्यानंतरच ती मार्गावर सोडण्याच्या सूचना दिल्या असल्या; तरी प्रत्यक्षात ब्रेकडाउनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. पीएमपी; तसेच ठेकेदारांच्या बसची देखभाल योग्य होत नसल्याचा आरोप होत असून, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महापौरांचे इंधन बचतीचे आवाहन
‘नगरसेवक- नगरसेविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘सामूहिक राष्ट्रीय जबाबदारी’च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा; तसेच शक्य तेव्हा ‘कारपुलिंग’चा पर्याय अवलंबावा,’ असे आवाहन महापौर मंजूषा नागपुरे यांंनी पत्राद्वारे सर्व नगरसेवकांना केले आहे. महापौरांनीही त्यांना दिलेल्या दोन वाहनांपैकी एक वाहनाचा वापर थांबवला आहे; तर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाने आठवड्यातून किमान एक दिवस खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा प्रस्ताव महापौरांनी आयुक्तांकडे पाठवला आहे. ‘अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास सायकलचा वापर करावा,’ असे नागपुरे यांनी म्हटले.
