अमरावतीमध्ये चक्क शेतकऱ्याला हनी ट्रॅपमध्ये ओढण्यात आल्याचा विचित्र प्रकार समोर आलाय. ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून तब्बल 70 लाख रूपये उकळण्यात आले आहेत. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून आरोपी पती-पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल रिचार्ज दुकानातून या हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे.
पीडित शेतकरी नांदगाव पेठ परिसरातील रहिवासी असून गाडगेनगर भागातील एका मोबाईल रिचार्ज आणि झेरॉक्सच्या दुकानात त्यांची आरोपी पती-पत्नीशी ओळख झाली होती. पीडित शेतकऱ्याने 2020 मध्ये आपली शेतजमीन विकली होती. या व्यवहारातून त्याला 2 ते अडीच कोटी रुपये मिळाले होते. शेतकऱ्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती मिळताच आरोपी दांपत्याने अत्यंत सुनियोजितपणे हनी ट्रॅपचा सापळा रचला.
शारीरिक संबंध ठेवले अन्…
सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी शेतकऱ्याकडून 10 हजार रुपये उसने घेऊन ते वेळेवर परत केले. नंतर महिलेने भावनिक जाळ्यात ओढून शेतकऱ्याशी जवळीक वाढवली व त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेने या शेतकऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवून शेतकऱ्याचे ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. ती त्याच्याकडे वेळोवेळी पैसे मागायची. या गोष्टीला वैतागून जेव्हा शेतकऱ्याने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी दांपत्याने शेतकऱ्याला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. “तुझी जिंदगी बरबाद करून टाकेन”, अशी भीती दाखवून त्यांनी या शेतकऱ्याचं ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवले.
70 लाख रुपये दिले
बदनामीच्या भीतीने तसेच समाजात आपल्यावर छी-थू होईल या विचाराने घाबरलेल्या या वृद्धाने 2020 ते 2024 दरम्यान टप्प्याटप्प्याने आरोपींना 70 लाख रुपये दिले. यामध्ये 25 लाख रुपये रोख आणि उर्वरित रक्कम बँक चेकच्या माध्यमातून देण्यात आली होती. आरोपींची पैशांची हाव संपत नसल्याने अखेर मानसिक दडपणाखाली आलेल्या शेतकऱ्याने 11 मे रोजी रात्री उशिरा पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
प्राथमिक पोलीस तपासामध्ये शेतकऱ्यांने या महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे समोर आले असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती अमरावतीचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करुन बँक खात्यांचे व्यवहार आणि पुराव्यांचा तपास सुरू केला आहे.
