मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुरुड जंजिरा किल्ला परिसरातील अत्याधुनिक जेट्टी प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले असून, यामुळे मुरूड-जंजिरा पर्यटनाला नवी ओळख मिळाली आहे. “समुद्र सफर आता अधिक सुरक्षित” या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे उंच लाटा, भरती-ओहोटी आणि खराब हवामानाच्या काळातही पर्यटकांना सुरक्षित बोट प्रवास करता येणार आहे.
107 कोटींचा खर्च
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १११.४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ९३.५६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. सागरमाला योजनेअंतर्गत राज्य हिस्सा निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर कामाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत सुमारे १०७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
प्रकल्पाअंतर्गत समुद्रातील प्रचंड लाटांपासून संरक्षण देणारी २५० मीटर लांबीची लाटरोधक भिंत उभारण्यात आली आहे. तसेच आधुनिक पाईल जेट्टी आणि अॅल्युमिनियम गँगवेच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षित चढ-उताराची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः पावसाळा, भरती-ओहोटी आणि खराब हवामानाच्या काळात होणारी अडचण आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वार्षिक साडेतीन ते चार लाख पर्यटक मुरूड-जंजिरा किल्ल्याला भेट देतात. या प्रकल्पामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असल्याने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. “जंजिरा पर्यटनाला सुवर्णस्पर्श” देणारा हा प्रकल्प रायगडच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
