ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी लागणारा निधी मिरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली असून, त्यानुसार आता महापालिकेकडून कार्यवाही हाती घेतली जाणार आहे. आवश्यक यापूर्वी भूसंपादन व रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च येत असल्याने महापालिकेने हा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी
ठाणे-घोडबंदर रस्त्यावरून होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत रस्ता अरुंद असून अनेक वळणे तसेच, चढ-उतार आहेत. याच मार्गावरून अवजड वाहनांची परराज्यांत ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अनेकदा नागरिकांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागते.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे-घोडबंदर रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फाऊंटन हॉटेल ते गायमुखदरम्यानचा सुमारे सहा किमीचा रस्ता ३० मीटरवरून ६० मीटरपर्यंत रुंद केला जाणार आहे. रस्त्याचे बांधकाम ‘एमएमआरडीए’ मार्फत, तर भूसंपादनाची प्रक्रिया मिरा-भाईंदर महापालिकेमार्फत राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता महापालिकेकडे वर्गही करण्यात आला होता.
काम का रखडले होते?
पालिकेने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात भूसंपादनासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा खर्च परवडणारा नसल्याचे सांगत फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने भूसंपादन व देखभाल-दुरुस्ती करण्यास नकार देत रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे ठाणे-घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच येत्या काळात हाती घेतल्या जाणाऱ्या घोडबंदर-मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत होती.
ही बाब लक्षात घेऊन दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ‘एमएमआरडीए’ आयुक्तांनी भूसंपादनासाठी लागणारा निधी सरकार किंवा ‘एमएमआरडीए’ मार्फत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच घोडबंदर-मिरा-भाईंदर मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दिवाळीनंतर कामाला सुरुवात शक्य
मिरा-भाईंदर शहराच्या नव्या विकास आराखड्यात ठाणे-घोडबंदर रस्ता रुंद दर्शवण्यात आला आहे. रुंदीकरणात बाधित होणाऱ्या जमीनमालकांना भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत पालिका प्रशासनाकडून नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून दिवाळीनंतर रुंदीकरणाचे काम ‘एमएमआरडीए’ला सुरू करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
