रेल्वेमार्गावर मानवी चुकांमुळे सिग्नल ओलांडल्याने अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने अद्ययावत पाऊल उचलले आहे. यानुसार उपनगरी रेल्वेवरील सिग्नलची माहिती आता मोटरमनना ऐकू येणार आहे. यासाठी लोकलमधील मोटरमनच्या कक्षात ‘सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टीम’ (सिलास) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे सिग्नलची दिशा, धोक्याचा इशारा वेळेआधीच ऐकू येणार आहे.
मुंबई उपनगरी मार्गावर बहुतांश सिग्नल हे अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असल्याने मोटरमनना सतर्क राहावे लागते. सुमारे ४००पैकी काही सिग्नल उजव्या, तर काही डाव्या बाजूस असल्याने अडचणींमध्ये भर पडते. या अडचणी दूर करत सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ‘सिलास’ ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा जीपीएसवर आधारीत असून ती रेल्वेच्या थेट स्थानानुसार पुढील सिग्नलचा क्रमांक आणि दिशा जाहीर करते. ‘पिवळा’ सिग्नल पार केल्यानंतर ‘काळजी घ्या, पुढचा सिग्नल लाल आहे’ असा सतत इशारा दिला जातो. सर्व मार्गांवरील सिग्नलचे ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’, ‘जीपीएस कोऑर्डिनेट्स’ आणि स्थानकांची माहिती प्रणालीमध्ये आधीपासून जमा केलेली आहे. याद्वारे लोकलचे ‘रिअल-टाइम लोकेशन’ आणि वेग नियंत्रण कक्षातून पडताळता येणार आहे.
- सिग्नलजवळ पोहोचण्यापूर्वी ३५० मीटर आणि २५० मीटर अंतरांवर ‘ऑडिओ अॅलर्ट’.
- पुढील स्थानकाची घोषणा ५०० मीटर आणि २५० मीटर आधी केली जाते.
- प्रणालीद्वारे पिवळा सिग्नल, पीएसआर, फलाट प्रवेश वेग तपासून त्याचे विश्लेषण केले जाते.
- मोटरमनच्या ड्रायव्हिंग पद्धतीचे विश्लेषण करून सुरक्षितता सुधारण्यासाठी मार्गदर्शन.
भारत टॅक्सीसाठी चालकांचा पुढाकार
केंद्राच्या सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडअंतर्गत (एसटीसीएल) सुरू होणाऱ्या भारत टॅक्सीसाठी महामुंबईसह पुण्यातील चालकांनी पुढाकार घेतला आहे. ‘सारथी हाच मालक’ संकल्पनेवर आधारित काम करणाऱ्या टॅक्सीसेवेत सहभागी होण्यासाठी बैठक नुकतीच झाली. कंपन्यांकडून आकारले जाणारे कमिशन, चालकांचे उत्पन्न आणि वाहतूक धोरण याविषयी १८ संघटनांमध्ये चर्चा झाली. मार्च २०२६पर्यंत सुमारे ३.७६ लाख चालकांची नोंदणी झाल्याचा दावा एसटीसीएलकडून करण्यात आला.
अ ॅप-आधारित टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर संयुक्तपणे लढा उभारणे आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर एकत्रित भूमिका घेण्यासाठी परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात बैठक नुकतीच पार पडली. भारत टॅक्सी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ अ ॅप-आधारित परिवहन युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
