घराखाली गुप्त धन’, मानवी खोपडी, हाडे, मंत्रतंत्राचा थरार, आघोरी बाबाचा पैशांसह जागेवरही डल्ला

अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरात स्वतःला आघोरी बाबा म्हणवणाऱ्या एका भोंदू व्यक्तीने गुप्तधनाच्या आमिषाने एका कुटुंबाची तब्बल 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित कुटुंबाला स्वतःचे घर पाडायला लावून मध्यरात्री आघोरी विधी करत जागेवरच कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, सर्जेपुरा येथील एका 22 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या नातेवाईक असलेल्या शिव आण्णासाहेब सोनवणे याच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. परिसरात आघोरी बाबा म्हणून ओळख असलेल्या शिव सोनवणे याने त्यांच्या घराखाली गुप्तधन आणि सोने दडले असल्याचे सांगत कुटुंबाला जाळ्यात ओढले.

घराखाली सोने आहे; आधी 50 हजार घेतले, मग घरच पाडायला लावले

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आघोरी विद्या आणि जादूटोणा करून गुप्तधन बाहेर काढून देतो, असे सांगत विधीसाठी 50 हजार रुपये मागितले. सोने मिळण्याच्या आशेने कुटुंबाने त्याच्यावर विश्वास ठेवत रोख रक्कम दिली. त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून त्यांनी स्वतःचे घर पाडले. यानंतर मध्यरात्री आरोपीने त्या जागेवर लिंबू, मानवी खोपडी, हाडे, भस्म, हळद-कुंकू यांची मांडणी करत मोठमोठ्याने मंत्रोच्चार सुरू केले. गुप्तधन बाहेर येणार असे सांगत जागा खोदायला लावण्यात आली.

मात्र, अनेक तासांच्या या कथित आघोरी विधीनंतरही काहीच हाती लागले नाही. त्यानंतर मोठी पूजा करावी लागेल तरच गुप्तधन हाती लागेल असे सांगितले. संशय वाढताच पैशांची मागणी केली . गुप्तधन न मिळाल्याने कुटुंबाला संशय आला. त्यांनी आरोपीकडे 50 हजार रुपये परत मागितले असता, सगळे पैसे विधीच्या साहित्यावर खर्च झाले अशी बतावणी करण्यात आली. अनेक दिवस टोलवाटोलवी केल्यानंतर अखेर आरोपीने पैसे देण्यास साफ नकार दिला.

जागा आता माझीच; आघोरी प्रयोगाने संपवण्याची धमकी

फिर्यादीने केलेल्या आरोपांनुसार, आरोपीने ही जागा आता माझी आहे, पुन्हा इथे आलात तर आघोरी प्रयोग करून संपवून टाकीन अशी थेट धमकी दिली. या धमकीनंतर घाबरलेल्या कुटुंबाने अखेर तोफखाना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरु केला आहे. या प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि आघोरी विधींच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुप्तधन, जादूटोणा आणि आघोरी शक्तींच्या नावाने सर्वसामान्यांना जाळ्यात ओढून आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *