सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होणारी ३३ हजार कोटींची गुंतवणूक तात्पुरती नसून, तिचा पुढील पंधरा ते वीस वर्षे नाशिकला फायदा होणार आहे. या गुंतवणुकीतून येत्या दहा वर्षांत जिल्ह्यात तीन लाख कोटींची अर्थव्यवस्था तयार होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
14 हजार कोटींचा हजार
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित उद्योग-कुंभ संगम व जिल्हा गुंतवणूक शिखर परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. हॉटेल ताज येथे बुधवारी (दि. ६) दिवसभर ही परिषद झाली. त्यात ३१४ उद्योगांनी १४ हजार १५ कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातून सुमारे ३५ हजार ८५७ नवे रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा आहे.
या वेळी काही उद्योजकांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करार सुपूर्द करण्यात आले. जांबुटके येथील प्रस्तावित आदिवासी क्लस्टरच्या जमिनीचे महसूल विभागाकडून औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरण करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘सिंहस्थाची विकासकामे पुढील पंधरा ते वीस वर्षे ‘मॅग्नेट’चे काम करील. दळणवळण, ड्रायपोर्ट, रिंग रोड या सुविधांमुळे दहा वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था तीन लाख कोटींवर जाईल. मधल्या काळात नाशिकच्या विकासाचा वेग मंदावला होता. मात्र, आता नाशिक मुख्य धारेत आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी विकासात भौगोलिक समतोल गरजेचा आहे. त्यासाठी राज्यभर गुंतवणूक परिषदा घेतल्या जात आहेत. गेल्या तीन वर्षांत या परिषदांतून नाशिकमध्ये ३१ हजार ९४५ कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होतील.
डिजिटल कुंभमेळा
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात एकूण ५७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यात महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो, जिंदाल, सिमेन्स या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. दावोस परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी बारा हजार कोटींची गुंतवणूक झाली. नाशिकचा विकास आता थांबणार नाही. नाशिकचा आगामी कुंभमेळा डिजिटल राहणार असून, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला जाणार आहे.’ प्रारंभी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी परिषद आयोजनामागील भूमिका विशद केली. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रास्ताविक केले.
