ना खाकी वर्दी, ना पोलीस सायरन, फिल्मी स्टाईल सापळा अन् निदा खानला बेड्या

नाशिकमधील बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी एखाद्या गुप्त मोहिमेप्रमाणे सापळा रचला होता. नारेगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या निदाला पकडण्यासाठी पोलिसांनी आपली ओळख लपवून, साध्या वेशात आणि खासगी गाड्यांनी एन्ट्री केली. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता पोलिसांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे निदा खानला सावरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. या प्रकरणी वरीष्ठ पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान ही अत्यंत सावध होती. पोलिसांची हालचाल लक्षात येताच ती जागा बदलत असल्याचे तपासात समोर आले होते. नारेगावसारख्या दाट वस्तीच्या भागात सरकारी गाड्यांचा ताफा किंवा गणवेशातील पोलीस दिसले असते, तर स्थानिक पातळीवर गर्दी जमा होण्याची किंवा माहिती फुटण्याची भीती होती. हीच जोखीम ओळखून नाशिक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिव्हिल ड्रेसमध्ये राहून ही मोहीम फत्ते करण्याचे ठरवले.

फ्लॅटवर छापा आणि रात्रीचा थरार

गेल्या तीन दिवसांपासून निदा खान नारेगावमधील कौसर पार्क भागात आपल्या नातेवाईकांकडे लपली होती. ती तिथेच असल्याची पक्की माहिती मिळताच, गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी त्या इमारतीला घेराव घातला. रहिवाशांना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत शांततेत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. निदा खान आपल्या कुटुंबासह तिथेच आढळून आली. जामिनासाठी हायकोर्टात जाण्याच्या तयारीत असलेल्या निदाच्या मुसक्या पोलिसांनी जागीच आवळल्या.

न्यायाधीशांच्या घरी रिमांड आणि गाडी बदलली

अटकेनंतर निदाला पोलीस ठाण्यात नेल्यास वातावरण बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी तिला थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर केले. तिथून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतल्यानंतर तिला रातोरात नाशिकला नेण्यात आले. प्रवासादरम्यान देखील पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. अर्ध्या वाटेत 15 सेकंदात आरोपीला एका गाडीतून दुसऱ्या गाडीत हलवण्यात आले, जेणेकरून कोणालाही पोलिसांचा पाठलाग करता येणार नाही. या संपूर्ण अटकेच्या मागे तांत्रिक तपासाचा मोठा वाटा आहे. दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून निदा संभाजीनगरात असल्याची खात्री पटली होती. ती कोणत्या वकिलांच्या संपर्कात होती आणि तिला कोणी आश्रय दिला, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

आतापर्यंत सात जणांना अटक

संशयित निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी निदा हिला अटक करण्यासाठी आपली तपासाची चक्रे आणखी तीव्र केली होती. या प्रकरणात टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या 5 पुरुष आणि एका महिला कर्मचाऱ्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 7 झाली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि महिला कर्मचाऱ्यांचा छळ करणे, असे गंभीर आरोप या सर्वांवर आहेत.

निदा खान ही या प्रकरणातील महत्त्वाची दुवा असल्याचे बोलले जात आहे. तिच्या चौकशीतून हे धर्मांतरणाचे रॅकेट नेमके कोठपर्यंत पसरले आहे? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस आता तिला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *