आज 6 तास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार बंद

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आज महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी संबंधित विमान कंपन्यांशी चर्चा करुन आणि आपापल्या फ्लाईट्सचे वेळापत्रक पाहून विमानतळावर यावं, असं आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अतिशय वर्दळीचे विमानतळ आहे. जगभरातून इथे प्रवासी येत असतात. तसेच इथून जगभरातील विविध देशांसाठी विमाने उड्डाण करत असतात. त्यामुळे हे विमानतळ अतिशय महत्त्वाचे विमानतळ आहे. देशातील महत्त्वाच्या आणि प्रमुख विमानतळांपैकी हे विमानतळ आहे. पण हे विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याबाबत महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि अखंडित विमानसेवा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मान्सूनपूर्व देखभाल कामे हाती घेण्यात येत आहेत. यासाठी आज (७ मे) विमानतळावरील उड्डाण सेवा तब्बल सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानतळावरील धावपट्टी 09/27 आणि धावपट्टी 14/32 या दोन्ही धावपट्ट्या पूर्णपणे बंद राहणार आहेत. या दोन्ही कार्यरत धावपट्ट्यांवर आवश्यक तांत्रिक तपासणी, दुरुस्ती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

विमानतळ सहा तासांसाठी बंद का राहणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या आधी ही देखभाल मोहीम राबवली जात आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्ट्यांवर पाणी साचणे, घसरण्याचा धोका निर्माण होणे किंवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी ही कामे अत्यावश्यक मानली जातात. त्यामुळे या सहा तासांच्या कालावधीत विमानतळाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, या बंदमुळे प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी विमान कंपन्यांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. उड्डाणांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्यात आले आहे. काही उड्डाणे पुढे ढकलण्यात किंवा पुनर्नियोजित करण्यात आली आहेत. प्रवाशांनी आपल्या उड्डाणाच्या वेळा तपासूनच विमानतळावर यावे, तसेच संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी ही देखभाल अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या उपाययोजनांमुळे आगामी काळात विमानसेवा अधिक सुरक्षित आणि सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *