इन्स्टाग्रामवरुन ओळख अन् मैत्रीतून प्रेम, मुलीवरून 2 अल्पवयीन मुलांमध्ये वाद; एका प्रेमविराचा बळी!

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.इंस्टाग्रामवर झालेली ओळख, त्यातून वाढलेलं प्रेम आणि त्याच प्रेमातून निर्माण झालेला त्रिकोण. यामुळे एका 17 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. एका मुलीवरून 2 अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. आणि हा वाद इतका टोकाला गेला की एकानं दुसऱ्याची भोसकून हत्या केली.

एकमेकांवर प्रेम असणं आणि एकमेकांवर प्रेम करणं ही रम्य कल्पना आहे. पण एकाच मुलीवर दोघांचं प्रेम जडल्यानं त्याचा खुनी शेवट झालाय. नागपुरात 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाची दुस-या अल्पवयीन मुलानं हत्या केलीय. हत्येचं कारण ठरलंय, प्रेमाचा त्रिकोण. 17 वर्षांच्या मुलाची इन्स्टाग्रामवर एका मुलीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्याचवेळी मुलीवर एकतर्फी प्रेम करणा-या दुस-या मुलालाही याची माहिती मिळाली. त्यानं मृत मुलाला वाजपेयी नगरमध्ये रात्री भेटायला बोलावलं. त्या दोघांमध्ये मैत्रीणीवरुन बाचाबाची झाली. या रागातून एका मुलानं दुस-याची भोसकून हत्या केली.

हत्येनंतर आरोपी फरार झालाय. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलीयेत.  पोलिसांनी सोशल मीडियावरील चॅटची तपासणी केली असता ही हत्या प्रेमाच्या त्रिकोनातून झाल्याची माहिती समोर आलीये.

हत्या झालेला आणि हत्या करणारा दोघंही अल्पवयीन मुलं आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना प्रेमातील यश-अपयश पचवण्याची हिंमत तरुणाईत राहिलेली नाही. नागपुरातील हा खून त्याचाच परिपाक आहे. त्यामुळं पालकांनो मुलं कुणाशी बोलतात, कुणासोबत फिरतात यावर लक्ष ठेवा.

 

आधी स्टेटस ठेवला मग, भररस्त्यात जीव घेतला

सोलापुरातील 70 फूट रोड परिसरात ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका तरुणाची सहा जणांनी मिळून कोयता, काठी, तलवार, आणि दगडाच्या सहाय्याने निर्घृण हत्या केलीय. सुरेश कृष्णा श्रीराम (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखून हत्या केली आहे. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर ” रक्तचरित्र ” या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नही , एक एक करके मारेंगे अशा पद्धतीचा व्हिडिओ हा इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवल्याने आरोपींनी पोलिसांना देखील चॅलेंज दिले आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या हत्या प्रकरणातीस आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अण्णारेड्डी या आरोपींना केवळ दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला तीन पत्नी असून त्यांची आठ लेकरं आता अनाथ झाली आहेत. मृत सुरेश कृष्णा श्रीराम हा याचा वडिलोपार्जित वराह पालनाचा व्यवसाय आहे.
काही वर्षांपूर्वी सुरेश श्रीराम याने 15-20 वराह मारून टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता. अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे सहा तरुणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काटा काढण्याचा प्लान बनवला. यातूनच त्याची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *