बारामतीत आता नवे दादा; अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत जय पवारांचा जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आता त्यांच्या कुटुंबीयांकडून सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘जनता दरबार’ सुरू केला आहे.

अजित पवार हे बारामतीतील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी नियमितपणे ‘जनता दरबार’ घेत असत. या उपक्रमामुळे बारामतीसह राज्यभरातील नागरिक आपल्या अडचणी, तक्रारी आणि विविध प्रश्न घेऊन त्यांच्या भेटीस येत असत. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी थेट समन्वय साधून समस्या मार्गी लावण्याची अजितदादांची कार्यशैली विशेष चर्चेत होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या उपक्रमात काहीसा खंड पडला होता.

आता जय पवार यांनी अजितदादांची ही परंपरा पुढे नेत दर गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बारामती येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबार सुरू केला आहे. या दरबारात नागरिकांच्या विविध समस्या, शासकीय कामे, स्थानिक अडचणी तसेच विकासकामांबाबतच्या मागण्या ऐकून घेण्यात येत आहेत. संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, जय पवार याांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत, कार्यकर्त्यांशी संवाद आणि आता जनता दरबाराच्या माध्यमातून थेट जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात बारामतीच्या राजकारणात जय पवार यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

पोटनिवडणुकीत दणदणीत विजय

सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीत २ लाख १८ हजार ८०६ मताधिक्याचा विक्रमी विजय मिळवून बारामतीवर पुन्हा पवार घराण्याचा ठसा उमटवला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांची परंपरा, विकासाचा वेग आणि स्थानिकांशी असलेली नाळ या सर्वांचा एकत्रित परिणाम मतपेटीत दिसून आला. मात्र, या विजयाची सर्वांत मोठी खासियत म्हणजे विजयानंतरची शांतता. इतका मोठा विजय असूनही जल्लोष दिसला नाही. पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढणाऱ्या अभिजित बिचकुले यांना ३३२ आणि करुणा मुंडे यांना ३०० मते पडली. नोटाला ७७३ जणांना पसंती दिली. अन्य १६ उमेदवारांना २०० मतांच्या आत समाधान मानावे लागले. यामध्ये चंद्रकांत मोटे यांना सर्वाधिक कमी ४२ मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *