अहिल्यानगर–बीड रेल्वे प्रवाशांना फटका; दुहेरीकरणाच्या कामामुळे 15 दिवस ट्रेन धावणार नाही, रेल्वेचा मोठा निर्णय

अहिल्यानगर आणि बीड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे विभागाने या मार्गावरील रेल्वे सेवांमध्ये मोठे बदल जाहीर केले असून, अकोळनेर-अहिल्यानगर-निंबळक दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या (डबल लाईन) कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय आहे कारण?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अकोळनेर ते निंबळक या सेक्शनमध्ये सध्या दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात आला असून, या कालावधीत अहिल्यानगर स्थानकावर केवळ अप आणि डाउन या मुख्य मार्गांवरूनच वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. स्थानकावरील परिचालन क्षमतेवर मर्यादा येत असल्याने काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

‘या’ गाड्या राहणार रद्द

प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या दोन महत्त्वाच्या गाड्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे

गाडी क्रमांक ७१४४१ (अहिल्यानगर–बीड)
गाडी क्रमांक ७१४४२ (बीड–अहिल्यानगर)

या दोन्ही गाड्या ४ मे पासून ते १९ मे पर्यंत पूर्णपणे रद्द राहतील. पंधरा दिवसांच्या या खंडामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना आता एसटी बस किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

 

दीर्घकालीन फायद्यासाठी तात्पुरती गैरसोय

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेले हे पायाभूत सुविधांचे काम भविष्यातील वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी अत्यंत गरजेचे आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील रेल्वेचा वेग वाढेल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल.

“भविष्यातील सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी हे काम अनिवार्य आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी,” असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय जनसंपर्क विभागाने केले आहे.

प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर खात्री करूनच घराबाहेर पडावे, जेणेकरून स्थानकावर जाण्याचे हेलपाटे वाचतील आणि धावपळ होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *