मध्य रेल्वे मार्गावर काही प्रवाशांकडून तिकीट खरेदी करताना चुकीच्या पद्धतीने आणि नको त्या कोट्यातून तिकीटे खरेदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विदेशी पर्यटकांच्या कोट्यातून भारतीय पर्यटकांनी तिकीटे खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैध सहाय्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या बुकिंगमधील अनियमितता उघडकीस आली आहे. या प्रकाराची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशाप्रकारे चालाखीने अनियमितता करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात आथा मध्य रेल्वे प्रशासनदेखील सतर्क झालं आहे. मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक (एफटी) कोट्याच्या गैरवापराविरोधातील आपली मोहीम तीव्र केली आहे.
हे प्रकरण 4 मे रोजी गाडी क्रमांक 12296 संघमित्रा एक्सप्रेसमध्ये उघडकीस आले, ज्यात काही भारतीय प्रवासी विदेशी पर्यटकांसाठी अनिवार्य असलेली आवश्यक कागदपत्रे न बाळगता एफटी कोट्याच्या तिकिटांवर प्रवास करत असल्याचे आढळले. एफटी कोट्याअंतर्गत भविष्यातील तारखांच्या बुकिंगचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. तपासणीत असे दिसून आले की, २४ एप्रिल २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत एफटी कोट्याअंतर्गत ३१ गाड्यांसाठी मध्य रेल्वेचे १७४ ओरिजिनेटिंग पीएनआर तयार करण्यात आले होते.
साडेतीन लाख रुपये दंड वसूल
एफटी कोट्याच्या तिकिटांची सत्यता पडताळण्यासाठी मध्य रेल्वे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान, एफटी कोट्याचा गैरवापर करून ३९ पीएनआर बुक केल्याचे आढळून आले. एकूण १२१ प्रवासी अनियमितपणे प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर प्रचलित नियमांनुसार शुल्क आकारण्यात आले आणि दंड म्हणून ३ लाख ५६ हजार ९१६ रुपये वसूल करण्यात आले. त्या प्रवाशांना बर्थवर बसण्याची परवानगी देण्यात आली नाही, जे नंतर आरएसी/प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना वाटप करण्यात आले.
या बुकिंगमध्ये कोणतेही अधिकृत बुकिंग एजंट सामील आहेत का? हे निश्चित करण्यासाठी आयआरसीटीसीकडून अतिरिक्त तपशील मागवण्यात आला आहे. एफटी कोट्याअंतर्गत अनधिकृत बुकिंगमध्ये सामील असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना ओळखण्यासाठी तपास सुरू आहे.
अपात्र कोट्याअंतर्गत तिकीट बुक करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी ज्या कोट्याअंतर्गत तिकीट बुक केले आहे, त्यासाठी आवश्यक असलेले वैध ओळखपत्र आणि पूरक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, अशी कोणतीही माहिती जवळच्या कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला किंवा १३९ वर किंवा रेल मदत ॲपद्वारे कळवावी/सामायिक करावी, असं मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटलं आहे. मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या तिकिटाची अचूकता आणि वैधता सुनिश्चित करण्याचे आवाहनही करीत आहे, असंही प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
