पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाच्या आस्थेचा आणि भक्तिभावाचा महासागर असलेल्या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात महानगरपालिकेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी प्रशासनाला अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत.
कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेश
गेल्या वर्षी पालखी मुक्कामाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. मात्र यंदा पालखी मार्गावर कुठेही गोंधळ, अस्वच्छता किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण नियोजनावर भर देण्यात आला आहे. मार्गावर स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, ठिकठिकाणी कचरामुक्त परिसर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वागत मंडळांनी स्पीकर व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी आणि पुरेशी स्वच्छतागृहे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
फील्डवर सक्रिय राहण्याचे निर्देश
भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये जलपान केंद्रे, वैद्यकीय तपासणी शिबिरे आणि आपत्कालीन सेवा केंद्रांचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाला “फील्डवर सक्रिय” राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बोपोडी हाइट बॅरिअर
रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन पालखी मार्गावरील खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः बोपोडी परिसरात असलेल्या तीव्र चढ-उतारामुळे तेथे ‘हाइट बॅरिअर’ बसवण्याचे आदेश PWD विभागाला देण्यात आले आहेत, जेणेकरून गर्दीतही सुरक्षितता कायम राहील.
गर्दीचे नियोजन अधिक सुटसुटीत करण्यासाठी होळकर पूल परिसरातील पालखी थांबा वेळ कमी करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच PMPML बससेवा अधिक सक्षम करून भाविकांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.उत्सव काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थापन काटेकोरपणे राबवले जाणार आहे. शाळा, स्थानिक संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून संपूर्ण यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत राहणार आहे.बोपोडी आणि खडकी परिसरात पालखी विश्रांतीसाठी सुमारे १५ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात येणार असून, त्या वेळेत भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुव्यवस्थित व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा हा भव्य सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून शहर “पालखी स्वागतासाठी पुणे सज्ज” झाले आहे.
