मुंबई पोलीस 25 एप्रिल रोजी पायधुनी येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणी फॉरेन्सिक अहवालांची वाट पाहत आहेत. आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांची प्रकृती बिघडली आणि दुसऱ्या दिवशी आई, वडील आणि दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने मुंबई हादरुन गेली. या घटनेच्या वृत्तानंतर कलिंगडांचा खप कमी झाला असून लोकांच्या मनात कलिंगडाबद्दल भीती बसली आहे. या घटनेचा तपास मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून सुरु असतानाच आता ही घटना आत्महत्या होती की हत्या, याचा तपास अधिकारी करत आहेत. या प्रकरणामध्ये मयत व्यक्तींचे फोन विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
स्टोपॅथॉलॉजिकल अहवालाची प्रतिक्षा
प्राथमिक माहितीनुसार, बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, सविस्तर फॉरेन्सिक निष्कर्ष समोर आल्यानंतरच या प्रकरणात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. 25 एप्रिल 2026 च्या रात्री पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार सदस्यांचा – एक जोडपे आणि त्यांच्या दोन मुली – झालेला रहस्यमय मृत्यू तपास अधिकाऱ्यांसाठी एक कोडेच आहे. अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष पोलीस तपासातून निघालेला नाही. मुंबई पोलीस सध्या हिस्टोपॅथॉलॉजिकल अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे मृत्यूच्या नेमक्या कारणावर प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिस्टोपॅथॉलॉजिकल अहवाल म्हणजे काय?
हिस्टोपॅथॉलॉजिकल अहवालामध्ये शरीरातील पेशींच्या नमुन्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. यामधून कर्करोग, दाह किंवा संसर्गासारख्या रोगांचे अचूक निदान करण्यास मदत होते. हा अहवाल पॅथॉलॉजिस्टद्वारे तयार केला जातो, ज्यामध्ये पेशींची रचना, रंग आणि वर्तणुकीचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर करतात.
आत्महत्या की हत्या? मोबाईलमध्ये दडलंय गुपीत?
हे प्रकरण आत्महत्या आहे की हत्या, हे निश्चित करण्यासाठी अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आत्महत्येच्या दृष्टीकोनातूनही या प्रकरणाचा तपास सुरू आह. तपासाचा एक भाग म्हणून, मृत व्यक्ती आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यू होण्यापूर्वी काही डेटा हटवला गेला होता का किंवा डिव्हाइस फॉरमॅट केले गेले होते का, याची तपासणी अधिकारी करत आहेत. खरोखरच अशी काही माहिती समोर आली तर या प्रकरणाला पूर्णपणे वेगळीच कलाटणी मिळेल असं सांगितलं जात आहे.
