रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

शहराच्या अंतर्गत मार्गातून धावणारी मेट्रो प्रस्तावित असून त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल अशी आशा होती. परंतु, ठाण्यातील रहिवाशांनीच या मेट्रोच्या बांधकामाला विरोध दर्शवला आहे. रहिवासी आणि नेत्यांनी या मार्गाला विरोध करत यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रोच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

मेट्रोला विरोध कशामुळे?

ठाणे मेट्रो रेल, किंवा रिंग रुट म्हणून ओळखली जाणारी ही मार्गिका ठाणे शहरात पश्चिमेकडील व्यावसायिक ठिकाणं आणि रहदारीच्या ठिकाणांमधील कनेकटीव्हिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या घोडबंदर मार्गाशीही ही मेट्रो जोडलेली असणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर अनेक स्थानकं प्रस्तावित आहेत. परंतु, ही मार्गिका जरी उन्नत असली तरी स्थानकं जमीनीवरून खांबावरतीच उभारली जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध खांबांमुळे वाहतूककोंडीची समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे स्थानिकांनी या मेट्रोला विरोध दर्शवला आहे.

या परिसरातील काही रहिवशांनी स्थानिक नेत्यांसहमहा मेट्रोच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. हिरानंदानी मेडोझ, रोडास, रुतू इस्टेट आणि हिरानंदानी इस्टेटमधील रहिवाशांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक श्रावण हर्डीकर आणि वरिष्ठ प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार संजय केळकरसुद्धा उसप्थित होते. त्यांच्या मते, शाळा, रुग्णालय आणि पादचाऱ्यांची गर्दी असलेल्या मार्गांवर मेट्रो स्थानकं उभारली तरी वाहतूक कोंडीत वाढ होणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

कसा आहे रिंग मेट्रोचा मार्ग?

केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यातून ठाणे रिंग मेट्रोसाठी 12,200 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता लवकरच या मेट्रोचं काम सुरू होणार आहे. ही संपूर्ण मार्गिका 29 किमी लांब असून ठाणे पश्चिमेत या मेट्रोच्या 22 स्थानकांचा समावेश आहे. ठाणे रिंग मेट्रोच्या एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल.

काही रहिवाशांनी तर या मेट्रोची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहरांत आधीपासूनच अंतर्गत रस्ते जाळे मजबूत असून घोडबंदर मार्गाचाही विस्तार सुरू आहे. त्यात एका मेट्रोचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. बहुते निवासी क्षेत्र घोडबंदर रस्ता आणि मेट्रो लाइन 4 (वडाळा ते कासारवडवली) पासून केवल 2 ते 3 किमी अंतरावर आहेत. तसेच, पश्चिमेकडील येऊर जंगलापासूनही अवघ्या 1 किमी अंतरावर आहेत. त्यामुळे या मेट्रोची गरज नाही असे त्यांनी सांगितले. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकार परस्पर निर्णय घेऊन पैसे वाया घालवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो प्रकल्पासाठी 3,000 झाडं तोडण्यास परवानी दिली आहे त्यामुळेही अनेक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *