मार्कशीटवर खाडाखोड अन् बापाचं डोकं फिरलं; 9 वर्षांच्या पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपवून घराला आग लावली

माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर प्रेम करण्याऐवजी, एका नराधम बापाने केवळ संशयापोटी आपल्या ९ वर्षांच्या चिमुकलीची इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हत्या केली. या अघोरी कृत्याने संपूर्ण देऊळगाव राजे परिसर सुन्न झाला असून आरोपी बापाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी शांताराम चव्हाण याला आपला मुलगा संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर (Marksheet) कोणीतरी खाडाखोड केल्याचा संशय होता. या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात असलेल्या शांतारामने आपली ९ वर्षांची मुलगी अनामिका हिच्यावर लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीने थेट हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात चिमुकल्या अनामिकाचा जागीच मृत्यू झाला.

पुरावे नष्ट करण्यासाठी घराला लावली आग!

हत्या केल्यानंतर या नराधमाने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कारवाई आणि तपास

निलेश आत्माराम फडणीस यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी शांताराम चव्हाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका बापाने इतक्या क्रूरपणे स्वतःच्या लेकीचा जीव घेतल्याने समाजातील ढासळत्या मानसिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *