महामुंबई परिसरातील पारा पुन्हा चढू लागण्याचा अंदाज आहे. बुधवार ६ मेपासून मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. कमाल तापमानाचा पारा मुंबईमध्ये ६ ते ८ मे दरम्यान ३६ अंश किंवा त्यापुढे जाण्याचा अंदाज आहे. मात्र आता वातावरणात आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे तापमानाची जाणीव ३६ अंशांपलीकडे वाटण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीमागचं कारण काय?
सध्या वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून असून त्यानंतर खालच्या थरात उत्तर तसेच ईशान्य पट्ट्यातून वारे वाहतील. हे वारे उष्ण आहेत. तसेच महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीही निर्माण होईल. यामुळे उष्ण वारे खालच्या थरात कोंडले जाऊन तापमान चढे जाणवू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. ही स्थिती दोन ते तीन दिवस महामुंबई परिसरात जाणवू शकते, असा सध्याचा अंदाज आहे.
मुंबईतील हवामान
मुंबईमध्ये सोमवारी सांताक्रूझ येथे ३४.२ तर कुलाबा येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सरासरीपेक्षा १.२ अंशांनी कमाल तापमान अधिक होते. तर आर्द्रता वाढल्याने किमान तापमानही आता चढे नोंदवले जात आहे. कुलाबा येथे २७.५ तर सांताक्रूझ येथे २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे किमान तापमान सरासरीपेक्षा १.१ अंशांनी तर सांताक्रूझ येथे २.४ अंशांनी अधिक होते. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याची जाणीव सकाळी आणि दुपारीही तीव्र होत आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील हवामान
अलिबागमध्ये सोमवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तब्बल ४.७ अंशांनी अधिक नोंदला गेला. अलिबाग येथे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर डहाणू येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भामध्ये, तसेच मराठवाड्यामध्येही पारा चढा आहे. पण शुक्रवारनंतर हे तापमान अधिक वाढू शकले. उत्तर आणि ईशान्य पट्ट्यातून आलेल्या वाऱ्यांचा परिणाम नंतर विदर्भावरही होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतर विदर्भ पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते.
