सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी येथे 34 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आली आहे. पूजा अनिल पोवार असे बेपत्ता महिलेचे नाव असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे. 1 मे रोजी शाळेत झेंडावंदन केल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती आहे. पतीसह तिचा आठ वर्षांचा लेक व्याकूळ झाल्याची माहिती आहे.
शिक्षिका बेपत्ता, पतीची पोलिसात तक्रार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेली 34 वर्षीय शिक्षिका पूजा अनिल पोवार 1 मे पासून बेपत्ता आहे. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शाळेत गेल्या, परतल्याच नाहीत
वैभववाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा पोवार या सोनाळी येथील चव्हाणवाडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्या एक मे रोजी सकाळी शाळेत आल्या होत्या. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
पोवार कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर दोन मे रोजी तिचे पती अनिल पोवार यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीसही तिचा शोध घेत आहेत. बेपत्ता विवाहित महिलेला 8 वर्ष वयाचा एक मुलगाही आहे. पोलिसांनी फोटो शेअर करत महिला कुठे निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
