तिला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच एका गायीला वासरू झाले होते. ते पाहण्यासाठीच ती गोठ्याकडे गेली’ अशा शब्दांत नसरापूर येथील अत्याचार व खूनप्रकरणातील चिमुरडीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या आठवणी सांगताना हळहळ व्यक्त केली. सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, त्या वेळी ही माहिती समोर आली.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी घडलेल्या या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीला आरोपी भिमराव कांबळे (वय ६५) याने ‘वासरू दाखवतो’ असे सांगत गोठ्याकडे नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पीडितेच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.
चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून रडताहेत
या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसांपासून आई-वडिलांनी अन्न ग्रहण केले नसल्याची माहिती समोर आली. आई सतत चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून रडत असल्याचे पाहून पोलिस आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कुटुंबीयांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी व उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप
“तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे” असे म्हणत आरोपीच्या मुलाने संताप व्यक्त केला. स्वतःच्या वडिलांविषयी इतका तिरस्कार आणि वेदना व्यक्त करताना तो म्हणाला, “त्या निष्पाप चिमुरडीला ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत. त्याला तात्काळ फाशी द्या.”
आरोपीची पत्नीही अश्रूंनी व्याकूळ झाली होती. “ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केलं, तिथेच त्याला ठेचून मारलं पाहिजे,” असे त्या संतप्त स्वरात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी स्वतः आई आहे. त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर काय परिस्थिती ओढावली असेल, याची कल्पनाही करवत नाही” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला. त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा आरोपीशी कोणताही संबंध नव्हता.
कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार
“तो काय करायचा, कुठे फिरायचा, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण त्याच्या कृत्यामुळे आमचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलानेही सांगितले की, “पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केले होते. त्यामुळे आम्हाला घर सोडावं लागलं. तेव्हापासून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.” कुटुंबीयांना या गुन्ह्यासाठी दोष देऊ नये, अशी विनंतीही त्याने केली.
साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात
नसरापूर येथील अत्याचार व हत्या प्रकरणाच्या तपासाला गती देताना पोलिसांनी महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. ‘सीसीटीव्ही’ फूटेजसह विविध तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले असून, त्याच्या आधारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे सध्या कसून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने विशेष पथक नेमून तपासाला सुरुवात केली होती. तपासाला वेग देत तिसऱ्याच दिवशी आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असून, त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासाच्या संवेदनशीलतेमुळे माहिती अधिकृत पडताळणीनंतरच जाहीर केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
