मिसिंग लिंक बनलाय ‘सेल्फी पॉइंट’! पोलिसांच्या आदेशानंतरही प्रवाशांचा बेफिकीरपणा सुरूच; 3 दिवसांत 98 जणांवर कारवाई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनी लोकार्पण झाले. त्यानंतर 2 मेपासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. पण त्यानंतर मिसिंग लिंकवर गाड्या थांबवून फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी प्रवासी थांबू लागले. त्यामुळे पोलिसांनी पुलावर थांबणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची घोषणा केली. पण त्यानंतरही नव्या मार्गाची भुरळ पडलेले नागरिक पुलावर गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याचे प्रकार कमी होत नाही आहेत. गेल्या 3 दिवसांत महामार्ग वाहतूक पोलिसांनी 98 जणांवर कारवाई करून दंड आकारला आहे.

सेल्फी पॉइंटची भुरळ

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे प्रवासात वेळ वाचत आहे. खोल दरीवर उभारलेला पूल प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु, हेच आकर्षणामुळे अपघातांना निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही नागरिक बैफिकरीने महमार्गावर थांबत असून रस्त्याकडेला फोटो, सेल्फी काढत आहे. कारवाईच्या आदेशानंतर हे प्रकार कमी होण्याची आशा होती. पण उलटच घडले. 2 मे (शनिवार) ते 4(सोमवार) मेदरम्यान पोलिसांनी तब्बल 98 प्रवाशांना फोटो काढताना पकडलं असून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

खोपली एक्झिट आणि सिंहगड इन्सिट्यूटदरम्यान असलेल्या 19.8 किमी लांब द्रुतगती महामार्गाऐवजी प्रवासासाठी दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. घाटातील धोकादायक वळणांऐवजी प्रवासी आता केवळ 13.3 किमी लांब मार्गावरून प्रवास करत आहेत. मिसिंग लिंकवर व्हायाडक्ट, टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांब केबल-स्टेड पूल आणि सह्याद्रीच्या डोंगरांमधूल तब्बल 9 किमी लांब जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. यामुळे द्रुतगती महामार्गाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. प्रवासात 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

या मिसिंग लिंकमुळे घाटात होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल अशी आशा होती. पंरतु, 600 फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलावर मध्येच थांबून ही संख्या पुन्हा वाढण्याची भीती आहे. या मार्गावरील मुंबई ते पुण्याच्या दिशेने जाणारा छोटा बोगदा बोरघाटाजवळ असून रायगड वाहतूक पोलिसांच्या हद्दीत येतो.

कठोर कारवाई करण्याचा इशारा

रायगड विभागाच्या महामार्ग पोलिसांनी पुलावर बेपर्वाईने थांबलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली. या केबल-स्टेड पुलावर थांबणे प्रवाशांसाठी आणि थांबणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कारवाई सुरू केली असून लोक थांबत राहिल्यास कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

2 मेपासून पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश देताच पहिल्याच दिवशी 15 प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला. दुसऱ्या दिवशी 3 मे रोजी 52 आणि 4 मे, सोमवारी 31 प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनचालकाडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. भविष्यात ही कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *