नांदेड जिल्ह्यात चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामध्ये नागरिकांना पुरेशी रक्कम दिली जात नाहीये. तर एटीएम मशीनमध्येही खडखडाट आहे. नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतोय
नांदेड जिल्ह्यात चलन तुटवडा निर्माण झालाय. बँकांमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नसल्यानं नागरिकांना जास्त रोख रक्कम दिली जात नाहीये. लग्नसराई असल्यानं कपडे, सोने-चांदी आणि इतर ऐवज खरेदीसाठी नागरिक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जात आहेत. मात्र रोकड पुरवठा कमी होत असल्याचं सांगून ग्राहकांना परत पाठवलं जात आहे. नांदेड शहरातील अनेक एटीएम मध्येही खणखणाट आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करतानाही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची रोकड बाजारात खेळती असावी लागते. लग्नसराईचा हंगाम असल्याने रोख रकमेची मागणी वाढली आहे. जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन राज्याची माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी रिझर्व बँकेला पत्र लिहून नांदेड जिल्ह्यासाठी तत्काळ 200 कोटी रुपयांची रोकड उपलब्ध करून देण्याची मागणी केलीये.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून नागपूरच्या करंसी चेस्ट मधून पुरेसा पैसा बँकांना पुरवला जात नाहीये त्यामुळे पैश्यांची कमतरता भासत आहे. पण ही कमतरता का निर्माण झालीये याबाबत रिझर्व बँकेकडून काहीही माहिती दिली जात नाही. नोटाछपाईमध्ये काही अडचण आहे की वितरणामध्ये अडचण आहे हे रिझर्व बँकेने स्पष्ट केले पाहिजे अशी प्रतिक्रिया बँकिंग तज्ञ् तुळजापूरकर यांनी दिली
ऐन लग्नसराईत बँकांमधून पैसे मिळत नसल्यानं लग्न घर असलेल्या कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोबतच दैनंदिन व्यवहार करण्यामध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
