पोलिस दलामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर वरळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या उपाधीक्षकाला अटक केली. दरम्यान या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार ही घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सर पोचखानवाला रोडवरील सिंग गार्डनमध्ये घडली. या ठिकाणी नऊ वर्षाची मुलगी खेळायला गेली होती. उपअधीक्षक त्याच वेळी गार्डनमध्ये बसले होते. मुलगी एकटीच खेळत असल्याचे पाहून त्याने तिच्यासमोर अश्लील चाळे केले आणि जबरदस्तीने जवळ घेत वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करण्यास सांगितले. हे पाहून मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून पळ काढला आणि सर्व घटना आईला जाऊन सांगितली. कुटुंबीयांनी कळवताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मुलीने उपअधीक्षकाकडे बोट दाखवून ओळख पटवली.
पोलिसांनी उपअधीक्षकाला ताब्यात घेतल्याचे पाहून त्याठिकाणी असलेला एक अल्पवयीन मुलगा पोलिसांकडे आला. काही दिवसांपूर्वी या काकांनी आपल्यासोबतही गैरप्रकार केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी याबाबत अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या पोक्सो तसेच भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून उपाधीक्षकाला अटक केली. न्यायालयाने या उपाधीक्षकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षकासारख्या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानेच असे घृणास्पद कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून सदर पोलिस अधिकाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
