एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा बदल करण्यात आला असून, व्यावसायिक वापर करणाऱ्यांना महागाईचा जोरदार फटका बसला आहे. 1 मे 2026 पासून 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ₹993 ने वाढ करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव, विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर निर्माण झालेली अनिश्चितता, यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले.
सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या 19 किलो सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
कमर्शियल सिलेंडरचे नवीन दर (19 किलो)
- दिल्ली – ₹3,071.50
- मुंबई – सुमारे ₹3,024
- कोलकाता – सुमारे ₹3,201.50
ही वाढ यावर्षातील सलग तिसरी वाढ आहे. 7 मार्च रोजी सुमारे ₹144 ने दर वाढले होते. 1 एप्रिलला पुन्हा जवळपास ₹200 ची वाढ झाली आणि आता थेट ₹993 ची मोठी उडी घेतली आहे.
शहरनिहाय घरगुती LPG दर
- चेन्नई – ₹928.5
- हैदराबाद – ₹965
- मुंबई – ₹912.5
- पुणे – ₹916
- कोलकाता – ₹939
- अहमदाबाद – ₹920
- आग्रा – ₹925.5
- कटक – ₹939.5
- जयपूर – ₹943
- लखनऊ – ₹950.5
घरगुती ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, म्हणून या दरात सध्या बदल टाळण्यात आला आहे. यंदा मार्च महिन्यात एकदाच ₹60 ची वाढ करण्यात आली होती.
वाढीमागचे कारण काय?
भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे 60 टक्के आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः पश्चिम आशियातील देशांमधून मोठ्या प्रमाणात गॅस आणि कच्चे तेल आयात केले जाते. सध्याच्या तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे, ज्याचा थेट परिणाम दरांवर दिसत आहे. सरकारने काही प्रमाणात रशियासारख्या देशांकडून तेल आयात वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही औद्योगिक क्षेत्रासाठी गॅस पुरवठा कमी करण्यात आला असून, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी एलपीजीची उपलब्धता मर्यादित करण्यात आली आहे.
एकूणच, घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिक क्षेत्रासाठी गॅस महाग झाल्याने महागाईचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
