‘नेस्को’तील ड्रग्ज पुरवठादार जाळ्यात; पोलंडहून परतताच महेश ऊर्फ मार्क खेमलानी याला अटक

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दोन मृत्यूप्रकरणात पोलिसांनी ड्रग्जचा मुख्य पुरवठादार महेश ऊर्फ मार्क खेमलानी याला शुक्रवारी अटक केली. या प्रकरणानंतर गायब झालेला महेश पोलंड येथून मुंबईत परतताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अटकेने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १२वर पोहोचली आहे.

गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रॉडक्शन यांच्या वतीने ‘९९९९९९९९९ – टेक्नो इव्हेंट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या ‘एमबीए’च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विहान ऊर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे आणि आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल, आयुष साहित्य, प्रदीप गुप्ता आणि जिया जेकब या अकरा जणांना अटक केली. या सर्वांची चौकशी आणि तपासामध्ये ड्रग्ज गोळ्यांचा पुरवठादार हा महेश असल्याचे दिसून आले. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून महेश गायब झाला होता. विदेशात पळाल्याचा संशय असल्याने महेश याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार पोलंडहून परतताच महेशला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विदेशातून आणून विकत असल्याचा संशय
महेश हा अनिवासी भारतीय नागरिक असून हाँगकाँग येथे त्याचे वास्तव्य आहे. मुंबईत आल्यावर तो मिरा रोड येथे राहतो. त्यामुळे विदेशातून अमली पदार्थ आणून महेश ते मुंबईत विक्री करीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याने आत्तापर्यंत किती ड्रग्जची विक्री केली, याबाबतही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महेश आणि जियामध्ये लाखोंचे व्यवहार
नेस्को प्रकरणात तपास करीत असताना पोलिसांनी ड्रग्ज विक्रीचे आर्थिक व्यवहार तपासले. यामध्ये मुलांनी घेतलेल्या गोळ्यांचे पैसे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू पाहणाऱ्या जिया जेकब हिच्याकडे पाठविल्याचे समोर आले. पुढील आर्थिक व्यवहारांमध्ये जिया आणि महेश यांच्यात लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार सापडले. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचे व्यवहार दोघांमध्ये झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *