पुण्यातील चिमुकली खेळता खेळता गायब अन् गोठ्यात शेणाखाली सापडली बॉडी; CCTV पाहून गावात संतापाची लाट

भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये विकृतीचं टोक गाठणारी संतापजनक घटना घडली आहे. वृद्ध व्यक्तीने दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केल्याचं उघड झालं आहे. गावात सगळं अगदी नेहमीसारखंच चाललं होतं… उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावात आलेली नातवंडं, अंगणात चाललेला खेळ. त्यातच एक दोन वर्षांची चिमुकली आपल्या आजीकडे आली होती. घरासमोर खेळत होती…सगळ्यांच्या नजरेसमोर. पण काही क्षणातच सगळं बदललं. चिमुकली अचानक दिसेनाशी झाली. सुरुवातीला वाटलं इथेच असेल, कुठे जाईल? पण वेळ जाऊ लागला तसं कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. हाका मारल्या, शेजारीपाजारी शोधलं… पण काहीच पत्ता नाही.

थोड्याच वेळात गावभर बातमी पसरली “मुलगी हरवली.” गावकरीही लगेच शोधायला बाहेर पडले. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू झाला आणि मग अखेर एका गोठ्याजवळ गर्दी जमली. गोठ्यात जे दिसलं, ते पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह तिथे पडलेला होता, तोही अत्यंत भीषण अवस्थेत. क्षणात नसरापूर गावात शांतता पसरली आणि त्यानंतर संतापाचा ज्वालामुखी फुटला. हे कोणी केलं? हा एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात. पोलिसांनी लगेच हालचाल सुरू केली. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यात एक धक्कादायक दृश्य दिसलं. एक वृद्ध माणूस त्या चिमुकलीला घेऊन गोठ्याकडे जाताना.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वृद्ध नराधमाने आधी चिमुकलीला फूस लावून गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिचा जीव घेतला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. ही माहिती बाहेर येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. लोक थेट गोठ्यासमोर बसले. आरोपीला आमच्या हवाली करा अशी जोरदार मागणी सुरू झाली. काहींनी तर मृतदेह हलवायलाही विरोध केला. वातावरण इतकं तापलं की, पोलिसांनाही परिस्थिती हाताळणं कठीण झालं. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, एका निष्पाप जीवावर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण गाव सुन्न झालं असून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. आपल्या नातीच्या वयाएवढ्या चिमुकलीवर अत्याचार करताना आणि तिचा जीव घेताना या नराधमाला एकदाही मानवतेचा विचार आला नसेल का? एवढे क्रूर विचार कसे असू शकतात? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *