मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट ओढवलं आहे. अनेक भागांत तब्बल 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडणार आहे. महापालिकेने वडाळ्यातील अमर महाल ते प्रतीक्षा नगर नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे 5 ते 6 मे रोजी, म्हणजे पुढच्या मंगळवारी आणि बुधवारी काही प्रभांगमध्ये 30 तास पाणीकपात केलं जाणार आहे.
कोणत्या वॉर्डवर परिणाम?
मुंबई उत्तरेत माटुंगा, शीव, वडाळा, दक्षिण भागांत परळ, शिवडी, एल वॉर्डमध्ये कुर्ला, साकीनाका, पूर्व भागात गोवंडी, मानखुर्द, पश्चिमेत चेंबूर आणि एन वॉर्डमध्ये घाटकोपरव, विक्रोळी, आणि विद्याविहार या भागांमध्ये 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 मे, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 मे, बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
बोगद्याच्या कामासाठी पुरवठा बंद
मुंबई महापालिकेने वडाळ्यातील अमर महल ते प्रतीक्षा नगरपर्यंत एका नवीन बोगद्याचं काम हाती घेतलं आहे. हा नवा बोगदा परळ, ट्रॉम्बे जलाशयाला जोडणार आहे. पुढे जाऊन तुर्भेतील उच्च स्तरीय जलाशयापर्यंत या बोगद्याचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये 1,800 मीमी व्यासाच्या बोगद्यासह इतर संबंधित कामे केली जाणार आहेत. या बोगद्याचं बांधकाम सुलभ करण्यासाठी तुर्भे येथील उच्च-स्तरीय आणि निम्न-स्तरीय जलाशयांमधील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. या 30 तासांच्या कालावधीत हे काम संपवून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल. त्यामुळे या काळात रहिवाशांनी पुरेसे पाणी साठवून ठेवून पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.
