1 मे पासून पेट्रोल 10 तर डिझेल 12.50 रुपये प्रति लीटर आणि CNG चे दर वाढणार? सरकारने केलं स्पष्ट

गेल्या काही दिवसानापासून सामान्य लोक टेन्शनमध्ये आहेत कारण १ मी पासून इंधन दरवाढ होणार असं सांगितलं जात आहे. १-३ रुपयांनी न्हवे तर तब्बल १० ते १२ रुपयांनी दरवाढ होणार असं समोर येत आहे. असं झालं तर सहाजिकच सगळीच महागाई होईल. पण आता या सर्व चर्चांवर पूर्णविराम मिळाला आहे. सरकारने यावर स्पष्टपणे माहिती दिली आहे. प्रेस माहिती ब्युरो (PIB) च्या फॅक्ट-चेक विभागाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका बनावट सरकारी आदेशाचा भंडाफोड केला आहे. या खोट्या डाक्युमेंटमध्ये असा दावा करण्यात आला होता की १ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार आहे. विशेषतः, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर ₹१० आणि डिझेलच्या किंमतीत ₹१२.५० वाढ केली जाणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.

व्हायरल डाक्युमेंट फेक?

हा डाक्युमेंट अत्यंत अधिकृत स्वरूपात तयार करण्यात आला होता आणि तो पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केल्याचा भास निर्माण केला गेला होता. त्यामुळे अनेक लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि तो मोठ्या प्रमाणावर शेअर केला. मात्र PIB ने याबाबत त्वरित स्पष्टीकरण देत सांगितले की हा आदेश पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PIB ने काय सांगितलं?

PIB ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून स्पष्टपणे नमूद केले की, “भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यासंदर्भात कोणताही आदेश जारी केलेला नाही.” तसेच, नागरिकांना अशा प्रकारच्या अप्रमाणित माहितीपासून सावध राहण्याचा आणि केवळ अधिकृत स्रोतांवर आधारित माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.

दरवाढीचं कारण काय दिलं होतं?

या बनावट आदेशात जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याचे कारण देण्यात आले होते. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा होत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी काही तपशीलवार आकडेही देण्यात आले होते, जसे की १ एप्रिल २०२६ पर्यंत पेट्रोलवर ₹२४.४० प्रति लिटर आणि डिझेलवर ₹१०४.९९ प्रति लिटर तोटा होत असल्याचे सांगितले गेले. मात्र हे सर्व आकडे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारच्या वतीनेही स्पष्ट भूमिका

सरकारच्या वतीनेही या विषयावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. काही ठिकाणी निवडणुकीनंतर दरवाढ होईल, अशा अफवाही पसरवल्या जात होत्या, त्या देखील पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर 

विशेष म्हणजे, एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले आहेत. या कालावधीत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कधी वाढल्या तर कधी कमी झाल्या, तरीही सरकारी तेल कंपन्यांनी त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा किंमती कमी झाल्या, तेव्हा कंपन्यांनी नफा मिळवला आणि त्या नफ्याचा उपयोग नंतर किंमती वाढल्यावर होणारा तोटा भरून काढण्यासाठी करण्यात आला.

नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांचीच वाट पाहावी, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *