ठाणे महानगरपालिकेत भाजपकडून सलग दोन टर्म नगरसेवक म्हणून कर्तृत्व गाजवल्यानंतर पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या माधवी नाईक यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली. नाईक यांच्या माध्यमातून ठाणे शहराला भविष्यात, आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्यानंतर माधवी नाईक यांच्या रूपाने महिला आमदार लाभणार आहे. त्यामुळे शहरातील पक्षीय संघटन मजबूत होण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ मिळवण्याची शक्यता आहे.
नगरसेवक म्हणून सुरुवात
ठाण्यातील श्रीरंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या माधवी नाईक यांनी १९९७ साली या प्रभागातून महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी नाईक या तत्कालीन शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख असणाऱ्या अनिता बिर्जे यांचा निसटता पराभव करून ठाणे पालिकेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर २००२ सालीही त्यांनी निवडणुकीत विजयश्री प्राप्त केली. मात्र २००७ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पक्ष संघटनेत जबाबदारी
“राजकारण म्हणजे समाजसेवेचे माध्यम आहे, सत्तेचे नव्हे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्यांना पक्षातील जबाबदाऱ्या मिळत गेल्या. महिला मोर्चा अध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष, आणि गेली तीन वर्षे अत्यंत जबाबदारीच्या भाजप प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकपदावर देखिल त्यांची नियुक्ती करण्यात आली. या जबाबदाऱ्या लीलया सांभाळताना त्यांनी दुष्काळग्रस्त भागात सलग दहा दिवस दौरे करून जलसिंचन योजनांचा अभ्यास केला. त्या क्षेत्रामधील उपाययोजना प्रत्यक्षात राबवल्या. त्यांच्या अर्थ फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून संस्कारवर्ग, व्याख्यानमाला, करिअर मार्गदर्शन आणि महिलांचे समुपदेशन असे उपक्रम राबवले. अखेर भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देत नवी संधी दिल्याने शहरातील पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही ठसा
बी.ए. शिक्षण पूर्ण केल्यानंतर चर्चगेट येथे शासकीय विधी महाविद्यालयात नाईक यांनी एल.एल.बी.साठी प्रवेश घेतला. प्रतिथयश ॲड. विजय आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली क्षेत्रात पाऊल ठेवले. राजकारणाबरोबरच त्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय राहिल्या आहेत. त्यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून तसेच ‘जंगल बुक’ व काही माहितीपटांसाठी आवाज देत डबिंग क्षेत्रातही काम केले आहे.
