सराईत गुन्हेगाराने टोळक्यासह अल्पवयीन युवतीच्या घरात शिरून तिची छेड काढत धुडगूस घातल्याचा प्रकार उपनगर हद्दीत घडला.
नेमकं काय घडलं?
एकतर्फी प्रेमातून युवतीची वारंवार छेड काढणाऱ्या या रोडरोमिओने थेट घरात शिरून तिचा विनयभंग करीत तिच्या भावावर कोयता फेकला. त्यानंतर भेदरलेल्या पीडितेने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे या टोळक्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सोळावर्षीय मुलगी आणि मुलगा रविवारी (दि. २६) रात्री आठ वाजता घरी असताना संशयित प्रेम प्रदीप गांगुर्डे (वय १९, रा. समतानगर) हा मित्र दर्शन उर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी आणि अन्य सहा साथीदारांसह पीडितेच्या घरी आला.
फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस,’ असे म्हणत युवतीला त्रास देऊ लागला. तिला स्पर्श करून विनयभंगही केला. प्रेम गांगुर्डे याने कमरेला लावलेला कोयता काढून युवतीच्या भावाच्या दिशेने फेकला. सुदैवाने त्याने हल्ला चुकविला. धुडगूस घालून हे टोळके निघून गेले. पीडितेने सोमवारी रात्री फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपनगर पोलिसांनी ‘पोक्सो’ सह अन्य गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून संशयित गांगुर्डे याला अटक केली आहे.
गांगुर्डेवर गंभीर गुन्हे
संशयित गांगुर्डे याच्यावर यापूर्वीही उपनगर पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार दर्शन उर्फ ओमकार सूर्यवंशी याच्यावर प्राणघातक हल्ला, चोरी, बेकायदेशीर जमाव जमविल्याचे गुन्हे नोंद आहेत. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
