सिंहस्थ कुंभमेळ्यातील ३५ कोटींच्या सीसीटीव्ही सर्वेक्षण कामाचा कार्यारंभ आदेश, तसेच ‘एआय’ आधारित सुरक्षेबाबतच्या ३५ कोटींच्या परवानगीपत्रावर खुद्द सिंहस्थ प्राधिकरण अध्यक्षांचीच बनावट डिजिटल स्वाक्षरी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सत्तर कोटींची बनवेगिरी उघड झाली आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यहार आणि कमिशनखोरीचा आरोप झाल्यानंतर आता सिंहस्थ प्राधिकरणाच्या लेटरहेडवर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून कार्यारंभआदेश काढल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सिंहस्थ कामांतील निविद प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, सर्वच निविदा आणि कार्यारंभ आदेशांची पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
सिंहस्थानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास ३० हजार कोटींची कामे सुरू आहेत. ही कामे वादात सापडली असताना गेल्या महिन्यात मंत्रालयातील लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि ‘कमिशन फिक्स’ झाल्याचे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.
