देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलसाठी पाठविलेल्या तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची परस्पर चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित लष्करी शिपायासह निवृत्त कर्मचाऱ्यावर देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुभेदार रामराव निवृत्ती शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देवळाली मिलिटरी हॉस्पिटलसाठी मे २०२४ मध्ये मुंबईतील कांदिवली येथील आर्मी मेडिकल स्टोअर डेपोतून १३३ बॉक्समध्ये विविध औषधे पाठविण्यात आली होती . यात मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी महागडी ‘ इन्शुलिन डेग्लुडेक ‘ आणि ‘ ह्युमन इन्शुलिन ‘ अशी एकूण १२ हजार ६६२ इंजेक्शन्स होती.
तत्कालीन लष्करी शिपाई नीरज सिंग (सध्या निलंबित) आणि निवृत्त कर्मचारी विनायक विठ्ठल कांबळे यांनी ही औषधे हॉस्पिटलमध्ये जमा न करता संगनमताने लंपास केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांनी ही औषधे देवळाली परिसरातील एका चाळीतील कांबळेच्या घरात उतरवली. तेथे मूळ बॉक्स फोडून औषधांचे पुन्हा पॅकिंग करण्यात आले . त्यानंतर ही औषधे टेम्पोद्वारे पुण्यातील कलाशंकरनगरातील नीरज सिंग याच्या घरी पाठविण्याचा कट रचण्यात आला. लष्करी गुप्तचर यंत्रणेने दोन वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. गुन्हे शोध पथक तपास करीत आहे .
