मुंबईमधील जगप्रसिद्ध जागांपैकी एक म्हणजे मरीन ड्राइव्ह! सूर्यास्ताच्या वेळी समोरच्या अथांग अरबी समुद्रामध्ये मावळता सूर्य पाहण्यासाठी येथे रोज हजारोंच्या संख्येनं पर्यटक येतात. याच मरीन ड्राइव्हवरील एका इमारतीचा शेकडो कोटींचा सौदा अंतिम टप्प्यात असून या इमारतीची खरेदी महाराष्ट्र सरकार करत आहे. हा सौदा नेमका काय आहे आणि कोणती इमारत राज्य सरकार खरेदी करतेय जाणून घ्या…
1600 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले
राज्य वित्त विभागाकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला 1600 कोटी रुपयांचा निधी गेल्या आठवड्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मंत्रालयाजवळ असलेल्या प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीच्या हस्तांतरणासाठी हा पैसा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेड (एआयएएचएल) यांच्यात करार होणार असून सदर खरेदीसाठी निधी मंजूर झाल्याने या व्यवहाराच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
पुढील दोन आठवड्यात करारावर होणार स्वाक्षऱ्या
केंद्र सरकारने मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारला 1,601 कोटी रुपयांना विकण्यास मार्च 2024 मध्ये मंजुरी दिली होती. राज्य मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2025 मध्ये या इमारतीच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली होती. कोणतीही त्रुटी टाळण्यासाठी हा करार संबंधित प्राधिकरणांकडे पाठवला जाईल आणि पुढील दोन आठवड्यांत त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्यूडी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
ही इमारत घेऊन राज्य सरकार करणार काय?
सरकार आणि एआयएएचएलकडून करारावर स्वाक्षरी होऊन इमारतीचे हस्तांतरण झाल्यावर, राज्य सरकार एका वर्षाच्या आत इमारतीचे अंतर्गत नूतनीकरण पूर्ण करून ती वापरासाठी सज्ज करण्याची योजना आखत आहे. त्यानंतर, सध्या भाड्याच्या जागेत असलेली अनेक सरकारी कार्यालये येथे स्थलांतरित केली जातील, असं सांगण्यात येत आहे. सध्या सरकार या कार्यालयांसाठी फार भाडं देत आहे.
5 लाख स्वेअर फूट जागा
2012 मध्ये महाराष्ट्र मंत्रालय संकुलात लागलेल्या मोठ्या आगीनंतर, राज्य सरकारची अनेक कार्यालये आणि विभाग शहराच्या विविध भागांमध्ये विखुरली गेली होती, त्यापैकी काही राज्य सचिवालयापासून आणि राज्य विधिमंडळाच्या तसेच मंत्रालयाच्या मुख्य इमारतीपासून फार दूर आहेत. एअर इंडियाच्या इमारतीच्या अधिग्रहणामुळे, मंत्रालयाच्या अगदी जवळ राज्य सरकारला सुमारे 46,470 चौरस मीटर (5,00,198.92 स्वेअर फूट) जागा उपलब्ध होईल. या ठिकाणी सरकारी कार्यालये सुरु झाल्यानंतर सर्वसामान्यांबरोबरच या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात येण्या-जाण्यासंदर्भात बराच फायदा होणार आहे.
इमारतीचा इतिहास काय?
एअर इंडियाची इमारत ही मुंबईमधील उच्चभ्रू नरिमन पॉइंट परिसरातील एक आयकॉनिक इमारत आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राच्या उच्चभ्रू नरिमन पॉइंट परिसरातील ही सुप्रसिद्ध इमारत, एअर इंडियाच्या खाजगीकरण योजनेचा भाग नव्हती. मंत्रालय आणि त्याच्या संलग्न इमारतीत जागेची कमतरता भासत असल्याने, राज्य सरकार आपली काही कार्यालये समुद्रकिनारी असलेल्या या 23 मजली इमारतीत हलवण्याची योजना आखत आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉन बर्गी यांनी डिझाइन केलेली एअर इंडियाची इमारत, राज्य सरकारने एअर इंडियाला भाडेपट्ट्यावर दिलेल्या पुनरुद्धारित जमिनीवर 1974 मध्ये बांधण्यात आली.
