‘पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने…’; पार्थ पवारांनी ‘करार रद्द करतोय’ म्हणत व्यक्त केला संताप

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र तसेच राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी नकळतपणे मंगळवारी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पार्थ पवारांनी या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करावा लागल्याबद्दल भाष्य केलं आहे. याच विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही न कळतपणे त्याच विमानातून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच पार्थ पवारांनी कठोर भूमिका घेत विमानासंदर्भातील बुकिंग करणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे.

‘व्हीएसआर एव्हिएशन’चे विमान का वापरले?

“मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना (शरद पवारांना) भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे ‘व्हीएसआर एव्हिएशन’चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान ‘व्हीएसआर एव्हिएशन’चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती,” असं पार्थ पवारांनी म्हटलं आहे.

करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत

तसेच, “ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत,” असं पार्थ पवारांनी स्पष्ट केलं आहे.

आमची भूमिका आजही कायम

“‘व्हीएसआर एव्हिएशन’बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे,” असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल  करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही,” असंही पार्थ पवारांनी म्हटलं आहे.

व्हीएसआरचं विमान पवार कुटुंबातील सदस्यांसाठी वापरण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन आजही काही राजकीय प्रतिक्रिया समोर येतील असं चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *