सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली, वाहनांच्या वर्दळीत ‘ट्रॅव्हल्स’ची भर; दादर, कुर्ला, वांद्रे परिसरात कोंडी

उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होताच मुंबईत रात्रीच्या वाहतूक कोंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घरी परतणाऱ्या वाहनांच्या गर्दीत आता खासगी प्रवासी बसगाड्यांची भर पडत असून, अनिश्चित पिकअप पॉइंटमुळे प्रवासी आणि वाहनचालक दोघांचाही मनस्ताप वाढला आहे. बस नेमकी कुठे येणार, किती वाजता येणार, याची ठोस माहिती नसल्याने प्रवाशांना फोन, मेसेजवरच अवलंबून राहून रस्त्यावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या मार्गावर रात्रीची कोंडी

रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित आरक्षित तिकिटांची वानवा, राज्य परिवहन महामंडळाकडे शयनयान सुविधेच्या वातानुकूलित बसगाड्यांचा अभाव, तसेच एसटीच्या भाड्यात स्वच्छता अधिभारासह १० टक्के वाढ, या कारणांमुळे खासगी बसकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. दर वाढूनही आरामदायी आणि खात्रीशीर आसन मिळत असल्याने अनेक जण खासगी बसगाड्यांनाच पसंती देत आहेत. मात्र राज्य परिवहन विभागाने खासगी बसगाड्यांसाठी निश्चित ‘पिकअप पॉइंट’ व्यवस्था उभारली नसल्याने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर रात्रीची कोंडी अधिक तीव्र होत आहे. एप्रिल-मे महिन्यात गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *