साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, औंधच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीचा हात सोडणार

सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. गायत्रीदेवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

विकासकामांना गती देण्यासाठी निर्णय

गायत्रीदेवींनी औंध परिसरातील कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक आयोजित केली होती. बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. औंध परिसरात उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. अजितदादांच्या प्रयत्नाने काही प्रकल्प पूर्णत्वास गेले. मात्र, अजितदादांचे अपघाती निधन झाल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहेत. त्या विकासकामांना गती देण्यासाठी ठोस राजकीय निर्णय घेणे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

२१ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडला

औंधसह २१ गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे आवश्यक असल्याचा सूर कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला. तसेच गायत्रीदेवींनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा आग्रह देखील कार्यकर्त्यांनी धरला. गायत्रीदेवींनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मात्र, त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, गायत्रीदेवींच्या एकूणच हालचाली पाहता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *