बॉडीच्या फोटोसाठी 3000, प्लास्टिक कंटेनरसाठी वणवण; मुंबईकर तरुणीचा स्ट्रेचरवरुन पडून मृत्यू, कुटुंबाची लूट

‘मृत्यू होण्यामागे नेमके कारण काय, हे कळण्यासाठी शवविच्छेदन करावे लागते. या प्रक्रियेत वैद्यकीय दस्तऐवजासाठी बॉडीचे छायाचित्र काढावे लागते. त्यासाठी तीन हजार रुपये द्या. छायाचित्र काढल्याशिवाय शवविच्छेदनाची प्रक्रिया कशी पूर्ण करणार’, असे प्रश्न उपस्थित करत दुःखात बुडालेल्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार कूपर रुग्णालयात घडला. उपचारादरम्यान तरुणीचे झालेले हाल कमी म्हणून की काय, तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुबीयांची लूट करण्यात आली.
रुग्णालयातील व्यवस्थेचा विदारक अनुभव

तीव्र पोटदुखीमुळे उपचारांसाठी कूपरमध्ये दाखल झालेल्या संध्या यादव या गोरेगाव येथील २४ वर्षीय तरुणीचा स्ट्रेचरवरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मुलीच्या अकाली मृत्यूमुळे दुःखात असलेल्या यादव कुटुंबीयांना संध्याचं शव ताब्यात मिळविताना रुग्णालयातील अंतर्गत व्यवस्थेचा अत्यंत विदारक अनुभव आला.

नमुन्यांसाठी प्लास्टिक कंटेनर

शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन हजार रुपयांची केलेली मागणी संध्याचे काका राजेंद्रसिंह यांनी सोमवारी पूर्ण केली. त्यानंतर शवविच्छेदनानंतर वैद्यकीय तपासणीसाठी संकलित केलेले नमुने ठेवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बाटली (प्लास्टिक कंटेनर) लागते. ती रुग्णालयात उपलब्ध नसून बाहेरून विकत आणण्यास यादव कुटुंबीयांना सांगण्यात आले. वणवण फिरून एक हजार रुपये खर्च करून राजेंद्र यांनी अखेरीस प्लास्टिक कंटेनर आणून रुग्णालयाकडे सुपूर्द केला.
रुग्णवाहिकेचा खर्चही अडीच हजार

रुग्णालयातून संध्याची बॉडी रात्री उशिरा गोरेगावला नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा खर्चही अडीच हजार रुपये आला. संध्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. तिचे पालक मोलमजुरी करतात. नुकत्याच कामाला लागलेल्या संध्यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागत होता. तिच्या इतर भावंडांचे शिक्षण पूर्ण होईल, अशी आशा होती. मात्र, संध्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संध्याला मृत्यूनंतर सन्मानाने निरोप मिळायला नको होता का, असा उद्विग्न करणारा प्रश्न यादव कुटुंबीयांनी केला. रुग्णालयाच्या हलगर्जीविरोधात त्यांनी पोलिसांकडेही दाद मागितली आहे.

संबंधित शवविच्छेदन केंद्र हे राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे तिथे संध्या यादव यांच्या कुटुंबीयांकडून ही प्रक्रिया पार पाडताना पैसे मागितले गेले का, याची कल्पना नाही.
– डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, कूपर रुग्णालय

शवविच्छेदन प्रक्रियेवळी पोलिसांकडून छायाचित्रकार उपलब्ध करून दिला जातो. तो पैशाची मागणी करतो का, याची आम्हाला कल्पना नाही. कलिना येथील प्रयोगशाळेमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर वैद्यकीय विश्लेषणासाठी जे अवशेष पाठवण्यात येतात, त्याचे नमुने घेण्यासाठी वापरात येणाऱ्या प्लास्टिक कंटेनरची उपलब्धता सध्या नाही. तेदेखील पोलिसांकडून येतात. कुटुंबीयांनी आमच्याशी संपर्क साधला असता, तर आम्ही त्यांना मार्गदर्शन केले असते.
– डॉ. संदीप इंगळे, प्रमुख, कूपर शवविच्छेदन केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *